लोकमत न्यूज नेटवर्क, मुरबाड: मुसळधार पावसाचा फटका मंगळवारी लोकल सेवेला बसला. यामुळे मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) - ठाणे, पनवेल दरम्यानची वाहतूक सकाळी ११:२५ नंतर ठप्प झाली. परिणामी कार्यालयांत जाण्यासाठी निघालेले प्रवासी ठिकठिकाणी अडकले. मुख्य मार्गावर ठाणे-कर्जत, कसारा, खोपोलीदरम्यान शटल सेवा सुरू होती. तर, पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली होती. दिवसभरात मध्य रेल्वेच्या सुमारे ७२० आणि पश्चिम रेल्वेच्या १०० लोकल फेऱ्या रद्द झाल्या.
मुंबईसह उपनगरांमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार सरींच्या वर्षावामुळे मध्य रेल्वेच्या मुंबईतून ठाण्यापर्यंतच्या सर्व रेल्वेगाड्या सकाळी रद्द करण्यात आल्या. लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली. या मार्गावरील सेवांवर पहाटे चार वाजल्यापासूनच परिणाम झाला.
शहाड-आंबिवलीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही दिशांच्या सेवांवर परिणाम झाला होता. नंतर संपूर्ण मार्गावर पाणी भरल्याने सेवा बंद करण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात रेल्वेसेवा सुरू ठेवण्यासाठी सामान्य पाण्याची पातळी लोकलसाठी ६ इंच तर मेल/एक्स्प्रेससाठी ४ इंच असते. दरम्यान मुख्य मडगावर अनेक भागांमध्ये ही पातळी ११ इंच झाल्यामुळे सेवा बंद करण्यात आली. मध्य रेल्वेवर केवळ कुर्ला, सायन, गोवंडी आणि चुनाभट्टी याच स्थानकांवर पाणी भरल्याच्या समस्येमुळे सेवांवर परिणाम झाला.
ही शटल सेवा सुरू होती
- हार्बर मार्ग : पनवेल ते वाशी, बेलापूर - उरण
- ट्रान्स हार्बर : ठाणे ते वाशी
- मुख्य मार्ग : ठाणे ते कल्याण-कसारा - खोपोली
येथील रुळांवर होते पाणी
- पश्चिम रेल्वे : दादर, माटुंगा रोड, माहीम, वसई, नालासोपारा, नायगाव
- मध्य रेल्वे : मशीद बंदर, करी रोड, परळ, कुर्ला, सायन
- हार्बर रेल्वे : चुनाभट्टी, दिघा, जीटीबीनगर, मानखुर्द, गोवंडी.
पश्चिम रेल्वे वाहतूक मंदावली
पश्चिम रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी पाणी भरल्याने ‘पॉइंट फेल्युअर’ झाले. वसई-विरारदरम्यान जलद मार्गावर आणि माटुंगा रोडदरम्यान धिम्या मार्गावर ‘पॉइंट फेल्युअर’ झाले होते. या बिघाडांमुळे प्रवाशांनी लोकलमध्ये न थांबता ट्रॅकवरून चालण्यास सुरुवात केली. दरम्यान, मुसळधार पावसातही पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद न होता संथगतीने सुरू होती. पण, अनेक लोकल रद्द केल्याचे अधिकारी म्हणाले.
काय घडले?
मध्य रेल्वेवर दुपारपर्यंत १६ एक्स्प्रेस ‘रिशेड्युल’, १४ एक्स्प्रेस रद्द, ५ एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या; तर पश्चिम रेल्वेवर २ पॅसेंजर सेवा रद्द, तर काही शॉर्ट टर्मिनेट केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मदतीसाठी हेल्पडेस्क
- मध्य रेल्वे सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, वडाळा, कुर्ला, वाशी.
- प. रेल्वे वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल
मध्य रेल्वेवर सेवा कशी?
- दररोज लोकल सेवा : १८१०
- पावसामुळे रद्द : सकाळी ११ पर्यंत सुमारे ३०; त्यानंतर सीएसएमटी - ठाणे / वाशी बंद.
- ८०० पेक्षा जास्त सेवा रद्द.
प. रेल्वेची सेवा कशी?
- दररोज लोकल सेवा - १४०६
- पावसामुळे रद्द - १००
- मेल / एक्स्प्रेस - १०० पेक्षा जास्त
- रद्द - २ पॅसेंजर , काही शॉर्ट टर्मिनेट
भुयारी मेट्रोच्या स्थानकांवर ‘टिप टिप बरसा पानी’
कफ परेड ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक आणि बीकेसी स्थानकातील गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या मेट्रो स्थानकांमध्ये पुन्हा गळती होऊ लागली आहे. गळतीचे पाणी जमा करण्यासाठी या स्थानकांत बादली ठेवण्याची वेळ आल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाच्या बी ५ प्रवेशद्वारावरील भिंती पाणीगळतीने ओल्या झाल्या आहेत. या स्थानकात जिन्यावरील पाणी पुसण्यासाठी दिवसभर कर्मचारी कसरत करीत आहेत. स्थानकातील तिकीट खिडकीच्या मजल्यावर गळती होणारे पाणी जमा करण्यासाठी एमएमआरसीने बादल्या ठेवल्या आहेत. बीकेसी स्थानकातही पाणी टपटपत आहे.
उद्घाटनाच्या घाईत दर्जाशी तडजोड नको
मेट्रो ३ मार्गिकेच्या कामाचा दर्जा उच्च असणे अपेक्षित होते. मात्र ही मार्गिका सुरू करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात घाईघाईने कामे करण्यात आली. त्यामुळे काही त्रुटी राहिल्याने गळतीचे प्रकार घडत असण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रशासनाने याबद्दल स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी वाहतूकतज्ज्ञ ए. व्ही. शेणॉय यांनी केली.
एमएमआरसी म्हणते...
अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता मेट्रो ३ मार्गिकेवरील सेवा कोणत्याही अडथळ्या आणि विलंबाविना सुरू आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत १२७ फेऱ्यांमधून १९,३४३ प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती दिली. मात्र गळती कशामुळे b ती रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याबाबत माहिती दिली नाही.
२५०+ विमानांना फटका
मुंबईत गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सलग दुसऱ्या दिवशी विमान सेवेला बसला. सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे २५० पेक्षा जास्त विमानांना विलंब झाला. आठ विमाने मात्र सूरत, अहमदाबाद विमातळाकडे पाठविण्यात आले.
विमान प्रवासाचे ट्रॅकिंग करणाऱ्या फ्लाईट रडार ॲपवरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून उड्डाण करणाऱ्या १५५ पेक्षा जास्त विमानांना कमी दृष्यमानतेमुळे उड्डाणासाठी विलंब झाला. तर मुंबईत उतरू पाहणाऱ्या १०२ विमानांना याच कारणामुळे उतरण्यास विलंब झाला. जवळपास १५ विमानांना मुंबई विमानतळावर उतरण्यासाठी आकाशात ४५ मिनिटे घिरट्या घालाव्या लागल्या. तर इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट कंपनीच्या आठ विमानांना सुरत आणि अहमदाबाद विमानतळाकडे वळविण्यात आले. सकाळी विमान सेवा जवळपास ४५ मिनिटे विलंबाने सुरू होती. संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर विलंबाचा कालावधी २० ते २५ मिनिटांवर आला होता. विमानसेवेला विलंब झाल्यामुळे अनेक विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
भर पावसात इंडिगोच्या बसला लागली आग
प्रवाशांना विमानापर्यंत ने-आण करण्यासाठी मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या इंडिगो कंपनीच्या एका बसला सोमवारी भर पावसात आग लागली. मात्र, बस रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी घडली नाही. विमानतळावरील अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझविली.
आव्हानात्मक लँडिंग
कमी दृष्यमानता, वारा व विमानाला धावपट्टीच्या रेषेत आणून ते उतरविणे हे अतिशय आव्हानात्मक असते. त्यात जर धावपट्टीवर पाणी साचलेले असेल तर परिस्थिती आणखीच आव्हानात्मक होते. मंगळवारी अशा स्थितीत दोन विमानांनी ‘आव्हानात्मक लँडिग’ केले. पहिल्या प्रयत्नात दोन्ही विमानांना उतरविण्यात यश आले नाही. त्यांनी पुन्हा उड्डाण केले व लँडिंगच्या रेषेत येत यशस्वीरीत्या लँडिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चाकरमान्यांना बेस्टचा आधार
मुसळधार पावसाने मुंबईची लाइफ लाईन असलेली लोकल रेल्वेसेवा ठप्प झाल्यानंतर चाकरमान्यांनी बेस्ट बसचा आधार घेण्यासाठी, दादर पूर्वेकडील दादर टीटी बसस्टॉपवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.
चाकरमानी सकाळी कार्यालयीन वेळेत निघाले मात्र सुट्टी जाहीर केल्याचे कळताच त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. काहींनी तोपर्यंत दक्षिण मुंबई गाठली होती तर काही दादरपर्यंत पोहोचले आणि अडकले. त्यापैकी अनेकजण रेल्वे ट्रॅकमधून चालू लागले, पण दादरच्या पुढे ट्रॅकमध्येही पाणी भरलेले होते. मध्य रेल्वे बंद तर वडाळ्यापासून हार्बरही ठप्प झाल्याने अनेकांनी बसस्टॉप गाठले. परिणामी, दादर टीटी बसस्टॉपवर तोबा गर्दी झाली होती.
कुणाला चेंबूरला जायचे होते तर कुणाला ठाण्याला, काहींना तर कल्याण-डोंबिवली गाठायचे असल्याने अनेकांनी मिळेल त्या बसने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. काही रस्त्यांवर पाणी तुंबल्याने काही बसमार्गही वळवण्यात आले होते. दादर टीटीवरून प्लाझाकडे जाणाऱ्या अनेक बसेस नायगाव क्रॉस रोड, दादर पूर्व असा वळसा घालून दादर पश्चिमेला येत होत्या.