Mumbai Rains: तब्बल ३२ वर्षांनंतर मुंबईत जानेवारीत पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:07 IST2026-01-02T13:07:27+5:302026-01-02T13:07:50+5:30
Mumbai Rains: नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मुंबईला थंडीने चाहूल दिली होती, तर डिसेंबरचे बहुतांश दिवस गारव्याचे होते. जानेवारीचे पहिले पाच दिवस किमान तापमान खाली येईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली.

Mumbai Rains: तब्बल ३२ वर्षांनंतर मुंबईत जानेवारीत पाऊस
मुंबई : मुंबईसह आसपासच्या परिसरातील हवामानात वाढलेल्या दमटपणामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऐन हिवाळ्यात पावसाळा अनुभवास आला. १२ जानेवारी १९९४ मध्ये मुंबईत १७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर ३२ वर्षांनी म्हणजे १ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत भल्या पहाटे पावसाने हजेरी लावली. या अवेळी पडलेल्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली.
नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मुंबईला थंडीने चाहूल दिली होती, तर डिसेंबरचे बहुतांश दिवस गारव्याचे होते. जानेवारीचे पहिले पाच दिवस किमान तापमान खाली येईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली. तोच जानेवारीच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई व पूर्व-पश्चिम उपनगरात पहाटे पडलेल्या पावसामुळे प्रदूषणही कमी झाले. मुंबईत ७५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९५१ सालच्या जानेवारी महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. तेव्हा सांताक्रूझ वेधशाळेत सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
उत्तर भारतातील पश्चिमी प्रकोपमुळे दक्षिणेकडील हवामानात बदल झाले. अरबी समुद्रातील हवामानात बदल झाले. याचा परिणाम म्हणून पावसाने हजेरी लावली, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले.
येत्या आठवड्यात दिवसा आणि त्यानंतर त्यापुढील सहा ते सात दिवसांत रात्रीच्या वेळी राज्यात काही ठिकाणी थंडी जाणवू शकते. मध्य भारतासह लगतच्या परिसरात बऱ्यापैकी गारठा जाणवू शकतो. त्यानंतर मात्र कालांतराने तापमानात वाढ होईल.
कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ
कुठे किती पाऊस (मिमी)
भायखळा १८
वांद्रे १६
सीएसएमटी १२
दादर ११
अंधेरी १०
कुलाबा ७
मलबार हिल ७
कुर्ला ४
मरोळ ४
मुलुंड १
वाशी १
कोपरखैरणे १