आणखी ३ दिवस पाऊस; ५ नोव्हेंबरनंतर वाजेल थंडी, मुंबईवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:33 IST2025-10-28T11:32:56+5:302025-10-28T11:33:48+5:30
तीव्र दाबाचे क्षेत्र सुरतवर धडकणार

आणखी ३ दिवस पाऊस; ५ नोव्हेंबरनंतर वाजेल थंडी, मुंबईवर परिणाम
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईत ढगाळ वातावरण आणि पाऊस राहील. तर बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ५ नोव्हेंबरनंतर पाऊस माघारी फिरून हळूहळू थंडीची चाहूल लागेल असाही अंदाज अभ्यासकांनी वर्तविला आहे.
आंध्र प्रदेशाच्या किनारी हे चक्रीवादळ मंगळवारी धडकणार असून, याचा परिणाम म्हणून बुधवारी, गुरुवारी विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. हे चक्रीवादळ छत्तीसगडच्या दिशेने जाणार असल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव नसेल. तर अरबी समुद्रात निर्माण झालेले तीव्र दाबाच्या क्षेत्राने वळण घेतले आहे. सुरतच्या आसपास गुरुवारी रात्री हे कमी दाबाचे क्षेत्र धडकणार असून, त्याचा प्रभाव मात्र मोठा असणार आहे. परिणामी उत्तर कोकणात गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती अथ्रेय शेट्टी यांनी दिली.
अधूनमधून हलक्या सरी
रविवारी मुंबईत दुपारपासून रात्रीपर्यंत पडलेल्या पावसाने सोमवारी मात्र बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती. अधूनमधून दाटून येणारा काळोख, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हलक्या सरींनी दिवस मावळला होता.
‘मोंथा’चा थाई भाषेतील अर्थ म्हणजे सुवासिक फूल होय. तर अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मध्यम पावसाची शक्यता आहे. ५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची शक्यता आहे. त्यापुढे हळूहळू थंडीची चाहूल लागेल - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ