विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 20:30 IST2025-11-09T20:28:10+5:302025-11-09T20:30:12+5:30
Sanjay Raut Radhakrishna vikhe Patil: राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना साखर कारखाना चालवून दाखवा म्हणत डिवचले. त्यानंतर संजय राऊतांनी विखे पाटलांना एक सवाल केला.

विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल एक विधान केले. कर्जबाजारी होतात आणि कर्जमाफी मागतात, असे विखे पाटील म्हणाले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारखान्यांना दिलेल्या कर्जमाफीचा मुद्द्यावर बोट ठेवलं. कलगीतुरा रंगला आणि विखे पाटील म्हणाले ठाकरेंनी बंद कारखाना घेऊन चालवून दाखवावा. ठाकरेंना डिवचताच प्रकृतीमुळे सार्वजनिक जीवनापासून लांब असलेल्या संजय राऊतांनी विखे पाटलांवर हल्ला चढवला.
शेतकरी कर्जबाजारी होतात आणि मग कर्जमाफी मागतात, असे विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, 'माझ्या विधानाचा आणि साखर कारखान्याचा संबंध काय? आमचा कारखाना सुरू होऊन ७५ वर्षे झाली. टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी एखादा तरी कारखाना सुरू केला का? टीका करणे सोप्पे आहे. शेतकरी हिताचा एखादा उद्योग किंवा एखादा बंद पडलेला साखर कारखाना घेऊन चालवून दाखवा', असे आव्हान देत विखे पाटलांनी डिवचले.
संजय राऊतांचे विखे पाटलांवर टीकास्त्र
राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट केली. ते म्हणाले, 'तुम्ही चालू कारखाने बंद पाडलेत. गणेश कारखान्याचे काय केलेत?', असा सवाल करत संजय राऊत यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे काय म्हणालेले?
विखे पाटलांच्या विधानावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "राधाकृष्ण विखे पाटलांच्या साखर कारखान्यांना आतापर्यंत किती वेळा कर्जमाफी केली आहे, याचा हिशोब आधी मांडावा. त्यांचे घोटाळे जगजाहीर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही."