बिल्डरांना तंबी! प्रशिक्षित आणि प्रमाणपत्रधारक एजंटसचीच नावे, पत्ते जाहीर करा"

By सचिन लुंगसे | Published: May 2, 2024 01:16 PM2024-05-02T13:16:03+5:302024-05-02T13:16:17+5:30

महारेराने 10 जानेवारी 23 च्या आदेशान्वये   एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले होते.

Promoters publish names and addresses of only trained and certified agents for sale of flats after January 1 - Maharera | बिल्डरांना तंबी! प्रशिक्षित आणि प्रमाणपत्रधारक एजंटसचीच नावे, पत्ते जाहीर करा"

बिल्डरांना तंबी! प्रशिक्षित आणि प्रमाणपत्रधारक एजंटसचीच नावे, पत्ते जाहीर करा"

मुंबई : आपल्या प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीसाठी 1 जानेवारीनंतर प्रशिक्षित आणि प्रमाणपत्रधारक एजंटसचीच नावे आणि पत्ते प्रवर्तकांनी जाहीर करणे अपेक्षित आहे. या निर्देशांचे पालन न करणाऱ्या प्रवर्तकांच्या प्रकल्पांवर यथोचित कारवाई करण्यात येणार असून यात प्रकल्पाला  नोंदणीक्रमांक नाकारण्यासारखी कारवाईही असू शकते . असे आदेश महारेराने नुकतेच जारी केले आहेत. ही कारवाई प्रकल्प उभारणीच्या काळात केव्हाही महारेरा करू शकते, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

 महारेराने 10 जानेवारी 23 च्या आदेशान्वये   एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले होते.  या अटीची पूर्तता करण्यासाठी  अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. याबाबतचा निर्णय महारेराने जाहीर केल्यानंतर  विकासकांच्या स्वयंविनियामक संस्थांसोबत इतर संस्थांनीही या अनुषंगाने अनेक प्रबोधनपर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केलेले  होते. मोठ्या प्रमाणात आयोजित या कार्यक्रमांना महारेरातील वरिष्ठांसोबतच या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही हजर राहून मार्गदर्शन केलेले आहे. एजंटसना प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी महारेराने सुमारे वर्षाचा कालावधी दिलेला होता. 

वर्षानंतर 1 जानेवारी 24 पासून हे प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन एजंट म्हणून नोंदणी किंवा नुतनीकरणही न करण्याचा निर्णय महारेराने घेतला. विकासकांनीही त्यांच्या व्यवहारांसाठी 1 जानेवारीनंतर अशाच प्रशिक्षित एजंटसचीच नावे संकेतस्थळावर ठेवावी आणि त्यांची मदत घ्यावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले होते. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर महारेरा यथोचित कारवाई करेल, असेही महारेराने वेळोवेळी जाहीर केले होते. असे असूनही काही प्रवर्तकांनी महारेराच्या निर्देशाचे पालन केलेले नाही, असे निदर्शनास आलेले आहे. म्हणून महारेराला हा कठोर निर्णय घ्यावा लागलेला आहे.

स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच  मिळते. या क्षेत्रातील एजंटसना  रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. ज्यात विकासक आणि प्रकल्प याची विश्वासार्ह प्राथमिक माहिती, प्रकल्पाच्या जमिनीच्या हक्काची  वैद्यता, रेरा नियमानुसार चटई क्षेत्र, इमारतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या तत्सम मंजुऱ्या, प्रकल्पाच्या विरुद्ध, असल्यास, कज्जेदलालीचा तपशील , संबंधित विकासकाची आर्थिक क्षमता याबाबी कशा मिळवायच्या, समजून घ्यायच्या हे त्यांना माहीत असायला हवे. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच  महारेराने एजंटसने  प्रशिक्षण  घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केलेले आहे.

- महारेरा  स्थावर संपदा क्षेत्रात फक्त प्रशिक्षित आणि प्रमाणपत्रधारक एजंटसच कार्यरत राहावे याबाबत आग्रही

- या अटींची पूर्तता न केल्यास निर्देशांचा भंग आणि उल्लंघन समजून  महारेरा नाकारू शकते संबंधित प्रवर्तकाला नोंदणी. प्रकल्प उभारणीच्या काळातही ही त्रुटी आढळल्यास नोंदणी  रद्द करण्याचीही तरतूद

- 1 जानेवारीपासून सर्व गृहनिर्माण प्रकल्प प्रवर्तकांना फक्त प्रशिक्षित आणि प्रमाणपत्रधारक एजंटसच्याच सेवा घेणे बंधनकारक

Web Title: Promoters publish names and addresses of only trained and certified agents for sale of flats after January 1 - Maharera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.