Join us

Eknath Shinde: 'केंद्रीय मंत्रीपदाची तयारी करा', राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांचं शिंदेंपुत्रासाठी ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:59 IST

राज्यातील राजकीय घडामोडींवर सोमवारी सकाळी शिंदे समर्थकांनी पुन्हा एकदा ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे हे ठाण्यात वडिलांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उरतले आहेत. संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नसून ते केवळ फिल्मी डायलॉग मारत आहेत. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून आमचाच विजय होईल, संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे गटाची सेना हीच खरी सेना असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा दावाही त्यांनी केला. शिंदेंच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांनी शिंदेंवर टीका करताना त्यांच्या मंत्रीपदासाठी एकप्रकारे दुजोराच दिला आहे.  

राज्यातील राजकीय घडामोडींवर सोमवारी सकाळी शिंदे समर्थकांनी पुन्हा एकदा ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले. सुरुवातीला टेंभीनाका परिसरात शिंदे समर्थकांनी मोठी गर्दी केली. यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिंदे समर्थक आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर पोहोचले. खा. शिंदे म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करत नसून केवळ आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. आमची शिवसेना वेगळी नाही. ती बाळासाहेबांच्या विचारांवर हिंदुत्वावर चालते. त्या शिवसेनेत आम्ही आहोत. ४० आमदारांचा आत्मा मेला असून त्यांचे मृतदेह परत येतील या राऊत यांच्या टीकेचाही खा. शिंदे यांनी समाचार घेतला. त्यानंतर, विद्या चव्हाण श्रीकांत शिंदेंवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. 

श्रीकांत शिंदेजी, महाराष्ट्रात गद्दारांना, पळपुट्यांना लढाऊ म्हणण्याची परंपरा नाही. लढणारे पराक्रम गाजवतात, दिल्लीला शरण जाऊन मुजरे करणारे, भाजपाचे हुजरे असतात, असे म्हणत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, केंद्रीय मंत्रीपदाची तयारी करा व बापसाला उपमुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघा. पण, बाळासाहेबांचं नाव व शिवसेनेचा लढाऊपणा विसरा, आता तुमच्यासाठी इतिहासात जमा झाला आहे, असे म्हणत एकप्रकारे सत्तास्थापनेला दुजोराच दिल्याचे दिसून येते. 

बच्चू कडू महाराष्ट्रात येणार

एकीकडे मविआ सरकार संकटात आलेले असताना मंत्रिमंडळ बैठकांमध्ये लोकहिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मविआ सरकार निवडणुकीची तयारी करत आहे. असे असताना तिकडे शिंदे गट मविआ सरकारला सुरुंग लावण्याची तयारी करत आहे. अशातच शिंदे गटाचे काही आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळत आहे.  

टॅग्स :श्रीकांत शिंदेएकनाथ शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसपुणेशिवसेना