Prakash Mehta, Vishnu Saware will get a drop from cabinet, Radhakrishna Vikhe and Ashish Shelar will get cabinet minister | Breaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार
Breaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार

मुंबई- गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. फडणवीस मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार असून, या विस्तारात अनेक मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळातून वगळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरिश अत्राम यांनाही घरी पाठवण्यात येणार आहे.

दुसरीकडे राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलारांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. अनिल बोंडे, संजय कुटे, अतुल सावे, योगेश सागर यांना राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेकडून दोन मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून, यात 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाचा समावेश असेल. शिवसेनेकडून तानाजी सावंत किंवा अनिल परब या दोघांपैकी एकाला मंत्रिपद मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे'. दरम्यान, याआधी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक वावड्या उठत असतानाच स्वत: मुख्यमंत्र्यांनीच ट्विट करून याबाबत माहिती दिली होती.

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले होते. यावरून पतंगबाजी सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद देण्यास भाजपामधील निष्ठावंतांचा विरोध असल्याची चर्चा आहे. मात्र, विखे व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. रामदास आठवले यांच्या रिपाइंला एक मंत्रिपद मिळू शकणार आहे. 


Web Title: Prakash Mehta, Vishnu Saware will get a drop from cabinet, Radhakrishna Vikhe and Ashish Shelar will get cabinet minister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.