चांगले रस्ते बांधणं हे रॉकेट सायन्स नाही, त्यांना का जमत नाही?; अमित ठाकरेंचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 01:39 PM2021-10-01T13:39:57+5:302021-10-01T13:43:35+5:30

जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत तोपर्यंत आपले रस्ते सुधारणारच नाहीत असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

Pothole: Building good roads is not rocket science; MNS Amit Thackeray targets Shiv Sena | चांगले रस्ते बांधणं हे रॉकेट सायन्स नाही, त्यांना का जमत नाही?; अमित ठाकरेंचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

चांगले रस्ते बांधणं हे रॉकेट सायन्स नाही, त्यांना का जमत नाही?; अमित ठाकरेंचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

Next
ठळक मुद्देठेकेदरांनी तुम्हाला न सांगता रस्ते बांधले जातात का? कामं देताना ठेकेदारांकडे पाहिलं जात नाही का? कारवाई करण्याचं नाटक केवळ लोकांना दाखवण्यापुरतंच आहे नाशिकमध्ये रस्ते चांगले मग इतर ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था का?

मुंबई – मनसे नेते अमित ठाकरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमित ठाकरे आज कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर जात होते. त्यावेळी अमित ठाकरेंनी रस्त्यांऐवजी लोकलनं प्रवास केला. चांगले रस्ते बांधणं हे काही रॉकेट सायन्स नाही. गेली २५ वर्ष सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना का जमत नाही? असा सवाल त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला विचारला आहे.

याबाबत अमित ठाकरे पत्रकारांशी बोलले की, चांगले रस्ते बांधणं हे काही रॉकेट सायन्स नाही. राजसाहेबांकडे इच्छाशक्ती होती म्हणून नाशिकमध्ये चांगले रस्ते बांधले गेले. तिथल्या रस्त्यावर एकही खड्डा नाही असं पत्रकारच सांगतात. मग गेली २५ वर्ष मुंबईची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना हे का जमत नाही? जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत तोपर्यंत आपले रस्ते सुधारणारच नाहीत असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

तसेच ठेकेदरांनी तुम्हाला न सांगता रस्ते बांधले जातात का? कामं देताना ठेकेदारांकडे पाहिलं जात नाही का? फक्त कारवाई करू असं सांगितलं जातं. लोकांचे जीव जातायेत. एक वडील त्यांचा मुलगा खड्ड्यात पडून मृत्यू झाला म्हणून ते खड्डे बुजवत फिरतात. जोपर्यंत हे सत्तेत आहेत तोपर्यंत काही होणार नाही. रस्त्याने जाऊन वेळ घालवण्यापेक्षा लोकलनं प्रवास केला. नाशिकमध्ये रस्ते चांगले मग इतर ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था का? कारवाई करण्याचं नाटक केवळ लोकांना दाखवण्यापुरतंच आहे असंही अमित ठाकरेंनी(Amit Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर(CM Uddhav Thackeray) नाव न घेता टीका केली आहे.

जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल

गुरुवारीही मनसे नेते अमित ठाकरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांवरुन मुंबई महापालिकेवर निशाणा साधला होता. रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. त्यात उच्च न्यायालयात वारंवार खोटं बोललं जात असेल तर जनतेच्या न्यायालयात त्यांना शिक्षा होऊ शकेल असं अमित यांनी म्हटलं होतं.

कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आले तर संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे त्यालाही जबाबदार धरून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती व उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतली होती.

Web Title: Pothole: Building good roads is not rocket science; MNS Amit Thackeray targets Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.