राजकीय पारा चढला; पण सरकार स्थिर; शरद पवार-उद्धव ठाकरे यांची सावध पावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 04:37 AM2020-05-27T04:37:47+5:302020-05-27T06:36:32+5:30

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णयाचा अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, पण सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले.

 Political mercury climbed; But the government is stable; Sharad Pawar-Uddhav Thackeray's cautious steps | राजकीय पारा चढला; पण सरकार स्थिर; शरद पवार-उद्धव ठाकरे यांची सावध पावले

राजकीय पारा चढला; पण सरकार स्थिर; शरद पवार-उद्धव ठाकरे यांची सावध पावले

Next

मुंबई : वैशाख महिना सरत आला, तरी सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने अंगाची लाहीलाही होत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी सत्तारूढ आणि विरोधी पक्षाकडून जोरदार बयानबाजी झाल्याने राजकीय तापमानाचाही पारा चांगलाच चढला.

महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेने दिली तर हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असे भाकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्तविले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णयाचा अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, पण सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले.

राज्यातील सरकार मजबूत आहे. तिन्ही पक्ष एकत्र आहेत. कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व ताकद पणाला लावली आहे. ठाकरे यांच्याबरोबरच्या चर्चेत राजकारण हा विषय नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी व इतर गप्पा झाल्या. मी राज्यात मुख्यमंत्री म्हणून परतणार, या बातम्या पोरकट आहेत.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

आम्ही भाजपच्या आमदारांना मुंबईत अजिबात बोलावलेले नाही. सरकार बनवण्याची आम्हाला घाई नाही. हे सरकार अंतर्विरोधाने पडेल. सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सक्षम नाही. त्यांनीच अधिक समर्थपणे परिस्थिती हाताळावी आणि त्यांच्या दोन मित्र पक्षांनी त्यांना फटाके लावण्याऐवजी मदत करावी.
- देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते

कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, हेच बरे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. सरकार स्थिर आहे.
खा. संजय राऊत, शिवसेना नेते

राष्ट्रपती राजवट आणणे चुकीचेच : राहुल गांधी

दिल्ली : आम्ही महाराष्ट्रात सरकारमध्ये असलो तरी हवे तसे निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत, असे सांगतानाच, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधकांची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी फेटाळून लावली.

विरोधकांना विरोध करण्याचा आणि सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे; पण लोकशाहीत निवडण्यात आलेले सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात कोरोना वेगाने पसरत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही तिथे सरकारमध्ये सहभागी आहोत; पण मुख्य निर्णय घेण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. सरकार चालविणे आणि समर्थन करणे, या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. तरीही मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्र सरकार कोरोनाबाबत आव्हानात्मक संघर्ष करीत आहे; पण महाराष्ट्राला केंद्र सरकार सहकार्य करीत नाही. मला तर याबाबत काळजी वाटते की, कोरोना वेगाने वाढत आहे आणि केंद्र सरकार राज्यांना मदत करीत नाही.

Web Title:  Political mercury climbed; But the government is stable; Sharad Pawar-Uddhav Thackeray's cautious steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.