विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण तापले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 10:01 AM2021-07-01T10:01:30+5:302021-07-01T10:16:00+5:30

मुख्यमंत्र्यांनी घेतली नेत्यांची बैठक : जोरदार हालचाली सुरू

The political atmosphere in the state heated up after the Assembly Speaker election | विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण तापले

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण तापले

Next
ठळक मुद्देविधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. ५ जुलै रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निवेदनाचा आधार घेत विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबतची योग्य कार्यवाही करा असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. ६ जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू असून ही निवडणूक आमच्या सरकारने विश्वासमत सिद्ध केले त्यापेक्षाही जास्त मतांनी जिंकू असा दावा महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला.

विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या फडणवीस यांनी आपल्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कार्य‌वाही करुन, याबाबत मला कळवा असे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. ५ जुलै रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी रात्री या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला  उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीच्या रणनीतीची यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही बहुमत सिद्ध केले होते 
त्यापेक्षाही अधिक मतांनी जिंकू. निवडणूक घेण्याबाबत आघाडीत एकमत आहे. आम्ही अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच पण त्याआधी विधानपरिषदेच्या १२ जागांचा प्रलंबित प्रश्नही राज्यपालांनी मार्गी लावावा.

नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका
n राज्यपालांच्या पत्रावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल व भाजपवरही टीका केली. ते म्हणाले की, राजभवन एकप्रकारे भाजपचे कार्यालय झाले आहे. 
n त्यांच्यामार्फत भाजप आपला अजेंडा राबवत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ५ व ६ जुलैच्या विधिमंडळ अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहा असा व्हिप पक्षाच्या आमदारांसाठी जारी केला.

Web Title: The political atmosphere in the state heated up after the Assembly Speaker election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.