आगामी निवडणुकीत मुंबईवरील वर्चस्व कायम राखण्याची नीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 05:12 AM2019-06-17T05:12:09+5:302019-06-17T05:12:34+5:30

विस्तारात साधले भाषिक, सामाजिक समीकरण

The policy to maintain dominance in Mumbai in the coming elections | आगामी निवडणुकीत मुंबईवरील वर्चस्व कायम राखण्याची नीती

आगामी निवडणुकीत मुंबईवरील वर्चस्व कायम राखण्याची नीती

Next

मुंबई : आशिष शेलार, योगेश सागर आणि अविनाश महातेकर हे तीन मुंबईकर नेते मंत्री झाल्याने मंत्रिमंडळातील मुंबईचा टक्का वाढला आहे. मुंबईच्या भाषिक, सामाजिक समीकरणांचाही विचार या विस्तारात करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, शेलार आणि सागर यांचा समावेश महत्त्वाचा मानला जात आहे.

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आशिष शेलार यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत चर्चा होती. सलग सहा वर्षे मुंबई अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली. युती फिस्कटल्यानंतर २०१७ सालची पालिका निवडणुक शिवसेना विरुद्ध भाजप अशीच झाली. भाजप नगरसेवकांची संख्या ३३ वरून ८३ झाली. या निकालाने मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. अध्यक्षपदाची यशस्वी कारकिर्द, केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी सलोख्याचे संबंध असतानाही, शेलार यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश लांबल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनसारख्या मुंबईतील महत्त्वाच्या संस्थांमध्येही शेलार यांचा वावर आहे. एकट्या मुंबईतून ३६ आमदार विधानसभेत जातात. त्यापैकी २०१४ साली १५ आमदार भाजपचे निवडून आले होते.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या हकालपट्टीनंतर गुजराती समाजाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता होती. योगेश सागर यांची राज्यमंत्रिपदी नियुक्ती करत हा प्रश्न निकाली काढण्यात आला. दरवर्षी सामूहिक विवाह सोहळे, गुजराती भजन कीर्तनाचा ‘डायरो’ आदी कार्यक्रमांच्या आयोजनामुळे सागर यांची गुजराती समाजात एक ओळख आहे. शिवाय, आधी नगरसेवक आणि आता आमदार म्हणून सागर यांची कामगिरी उजवी आहे. विधानमंडळातही आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ते अल्पावधीत चर्चेत आले. सागर यांच्या समावेशाने मेहता यांची वजाबाकी बरोबरीत सुटली आहे.

मित्रपक्ष आरपीआयच्या कोट्यातून अविनाश महातेकरांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. महातेकर अद्याप विधानसभा अथवा परिषदेचे सदस्य नाहीत. तीन-चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होतील. आमदार नसतानाही सहा महिने मंत्रिपदावर राहण्याची सोय असल्याने, महातेकरांना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. दलित पँथरच्या संस्थापकांपैकी महातेकर एक आहेत.
दलित समाजावरील अन्याय, अत्याचाराविरोधात त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. १९९० पँथरमध्ये फूट पडल्यानंतर महातेकरांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआयमध्ये प्रवेश केला. आठवले यांचे विश्वासू साथीदार अशी त्यांची ओळख आहे. पक्षाच्या वैचारिक बांधणीतील ते अग्रणी आहेत. आंबेडकरी चळवळीतील सहभागाबरोबरच विविध विषयांवरील त्यांचे वैचारिक लेखन महत्त्वाचे आहे.

विद्या ठाकूर यांचे मंत्रिपद बचावले
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना डच्चू देण्यात येईल, अशी चर्चा होती. ठाकूर घराण्याचे रा.स्व.संघातील प्रस्थ, जनसंघापासून हा परिवार भाजपमय राहीला. शिवाय, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांत ठाकूर घराण्याने संस्थात्मक कार्य उभारले आहे. त्यामुळे विद्या ठाकूर यांचे मंत्रिपद बचावल्याचे सांगण्यात येत आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुंबईकर कॅबिनेट मंत्र्यांची संख्या चारवरून पाच तर राज्यमंत्र्यांची संख्या दोनवरून चार झाली आहे.

Web Title: The policy to maintain dominance in Mumbai in the coming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.