भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:46 IST2026-01-06T06:45:41+5:302026-01-06T06:46:04+5:30
केंद्र आणि राज्य सरकारबद्दल कोणताही मुद्दा मांडण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पिंपरी-चिंचवडमध्ये पालिका व तिथल्या प्रश्नांसंदर्भात मी माझी भूमिका मांडली. केंद्र आणि राज्य सरकारबद्दल कोणताही मुद्दा मांडण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले.
अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत भाजपवर टीका करत महापालिका लुटून खाल्ली, या लुटारूंना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे म्हटले होते. त्यावर अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाबद्दल बोलत आहेत. आरोप - प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही आरोप करायला गेलो तर त्यांना अडचणी निर्माण होतील. त्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, आम्ही काँग्रेसबरोबर राज्यात व केंद्रात १५ वर्षे सत्तेत होतो. पालिकेत एकमेकांविरोधात लढायचो तेव्हा पालिकांच्या प्रश्नासंदर्भात तिथल्या कारभारावर मत व्यक्त करायचो. आमच्या काळात काय कामे झाली व २०१७ नंतर काय झालं याची तुलना करणारच, पिंपरी चिंचवडमध्ये २०१७ नंतर काय झाले ते सभांमध्ये मांडणार.