Join us
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनी योगाच्या माध्यमातुन जगाला उत्तम आरोग्याची किल्ली दिली- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 11:17 IST

योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी रहा असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. 

मुंबई: जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. भारतासह महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 'गेट वे ऑफ इंडिया' येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सहभागी होऊन योग प्रात्यक्षिके केली.

धकाधकीच्या जीवनामध्ये योग ही काळाची गरज असून ही लोकचळवळ झाली पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करायला सुरुवात केली. नरेंद्र मोदी यांनी योगाच्या माध्यमातुन ही आरोग्याची गुरुकिल्ली संपूर्ण जगाला दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरामध्ये असंख्य मंडळींनी एकाच वेळेस योग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी रहा असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. 

विधानभवन परिसरात देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने 'योग प्रभात' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल रमेश बैस यांच्यासह या कार्यक्रमात सहभागी होऊन योगाभ्यास केला. शरीर, मनाच्या उत्तम आरोग्यासाठी योग करणे अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताण तणाव वाढले आहे. या ताण तणावावर योग हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे. योग साधनेमुळे असाध्य आजारही बरे होतात. आज राज्यात सर्वदूर योग दिनाचे अनेक कार्यक्रम होत आहेत हे निश्चितच आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले.   

टॅग्स :एकनाथ शिंदेयोगासने प्रकार व फायदेनरेंद्र मोदीमहाराष्ट्र सरकार