प्लॅस्टिकमुळे फेरीवाल्यांचा परवाना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 01:06 AM2019-02-02T01:06:17+5:302019-02-02T01:06:50+5:30

कारवाईच्या पहिल्याच दिवशी २२ किलो प्लॅस्टिक जप्त करून ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला

Plastic rejection license due to plastic | प्लॅस्टिकमुळे फेरीवाल्यांचा परवाना रद्द

प्लॅस्टिकमुळे फेरीवाल्यांचा परवाना रद्द

Next

मुंबई : ग्राहकांना प्लॅस्टिक पिशवी देणाऱ्या फेरीवाल्यांना महापालिकेने आजपासून कारवाईचा बडगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी २२ किलो प्लॅस्टिक जप्त करून ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सहा फेरीवाल्यांकडे प्लॅस्टिक सापडल्यामुळे त्यांचा परवानाच रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राज्य सरकारने २३ जून, २०१८ पासून प्लॅस्टिकबंदी लागू केली आहे. या अंतर्गत महापालिकेने सहा महिन्यांत मुंबईभर जोरदार कारवाई केली, नंतर कारवाई थंडावल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा प्लॅस्टिकचा वापर सर्वत्र सुरू झाला. फेरीवालेच ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या देऊन या मोहिमेला हरताळ फासत आहेत. त्यामुळे महापालिकेने विशेष पथक स्थापन करून पुन्हा कारवाई सुरू केली आहे.

या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी पालिकेच्या विशेष प्लॅस्टिक विरोधी पथकाने फेरीवाल्यांची तपासणी केली. काही फेरीवाल्यांकडे सापडलेले एकूण २२ किलो प्लॅस्टिक जप्त तर ९५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. सहा फेरीवाल्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून उत्तर देण्यास १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर, त्यांचा परवानाच रद्द करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. ही कारवाई अधिक तीव्र झाल्यास मुंबई प्लॅस्टिकमुक्त होऊ शकते़

३५ हजार किलो प्लॅस्टिक जप्त
गेल्या सात महिन्यांमध्ये महापालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३५ हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.
निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या निरीक्षकांकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत प्रत्येक दिवशी ६० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत सरासरी दंड वसूल करण्यात येत आहे.
पालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासाठी १०७ निरीक्षक, ४०० वरिष्ठ निरीक्षक आणि २६० कामगारांचे पथक तयार करण्यात आले आहे.

Web Title: Plastic rejection license due to plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.