पूर्वेकडील रहिवाशांना मिळणार पाइप गॅस

By Admin | Updated: June 18, 2015 00:37 IST2015-06-18T00:37:02+5:302015-06-18T00:37:02+5:30

ठाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या महानगरच्या पाइप गॅसच्या वाहिन्या रेल्वेच्या जागेतील पुलावरुन नेण्यास रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी

Pipe gas to residents of eastern region | पूर्वेकडील रहिवाशांना मिळणार पाइप गॅस

पूर्वेकडील रहिवाशांना मिळणार पाइप गॅस

डोंबिवली : ठाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या महानगरच्या पाइप गॅसच्या वाहिन्या रेल्वेच्या जागेतील पुलावरुन नेण्यास रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी तत्वत: मान्यता दिली. यामुळे पूर्वेकडील नागरिकांना अल्पावधीतच पाइप गॅस उपलब्ध होणार आहे. ठाणे स्थानकातील विविध समस्यांसह इतर मागण्यांबाबत खासदार राजन विचारे यांनी म.रे.चे महाव्यवस्थापक एस.के. सूद यांच्याकडे बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पाइप गॅससाठीच्या वाहिन्या पश्चिमेकडून पूर्वेकडे नेण्यास रेल्वेची परवानगी मिळत नसल्याचे महानगर गॅसचे पियुष गुप्ता यांनी सांगितल्यावर रेल्वेने त्यास तात्काळ मान्यता दिली.
पावसाळ्याआधी स्थानकातील गटारांची स्वच्छता करण्यासह फलाटातील पादचारी पुलाच्या कामासाठी काढण्यात आलेले छत अद्यापही बसवलेले नाही, ही कामे तातडीने होणे आवश्यक आहे. तसेच स्थानकात स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने विशेषत: महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. ती तातडीने दूर व्हावी यासाठी प्रत्येक फलाटात त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह हवे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी स्थानकातील उपहारागृहांना होणारा पाणीपुरवठा दूषित आहे की नाही याबाबतची तपासणी करण्यावरही चर्चा झाली. येथूनच पहिली रेल्वे धावली. त्याची गाथा सांगणारे छायाचित्र प्रदर्शनही येथे मांडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

मेंटल हॉस्पिलटच्या जागेवर होणार एलेव्हेटेड स्थानक
मेंटलच्या त्या जागेवर स्थानक उभारणीसाठी तांत्रिक अडचणी असून त्यापेक्षा तेथे एलेव्हेटेड स्थानक करण्याचा मानस असल्याचे सूद यांनी स्पष्ट केले.

Web Title: Pipe gas to residents of eastern region