Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडे हाणतील; उद्धव ठाकरेंनी भाजपा, काँग्रेसला दिल्या कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 07:49 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  तसेच भाजप नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेचा  समाचार घेताना ठाकरे यांनी प्रामुख्याने मित्रपक्ष काँग्रेसला अप्रत्यक्षपणे धारेवर धरले.

मुंबई : कोरोना संकटकाळात रोजी-रोटीच्या प्रश्नाने नागरिक चिंताग्रस्त असताना त्यांची अस्वस्थता लक्षात न घेता कोणी स्वबळाचा नारा देणार असेल तर लोक जोडे हाणतील, अशा कडक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व भाजपला फटकारले. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी  त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  तसेच भाजप नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेचा  समाचार घेताना ठाकरे यांनी प्रामुख्याने मित्रपक्ष काँग्रेसला अप्रत्यक्षपणे धारेवर धरले. ते म्हणाले, ‘अनेकांचा आज रोजगार गेला आहे. माझं काय होणार ही चिंता आहे. आता निवडणुकाही नाहीत. अशावेळी कोणी स्वबळाचा नारा देणार असेल तर लोक जोडे हाणतील. ते म्हणतील, माझ्या रोजीरोटीचं काय ते सांग. तू स्वबळ सांगणार आणि आम्हाला भिकेला लावणार. कोरोनातही राजकारण होत असेल तर देश अस्वस्थतेकडे जाईल,’ असा चिमटाही त्यांनी काढला. 

सत्तेसाठी लाचार नाही 

ठाकरे म्हणाले, ‘सत्तेसाठी शिवसेना कधीही लाचार होणार नाही. उगाचच कोणाची पालखीही वाहणार नाही. शिवसेनेचा जन्म लोकांच्या न्याय हक्कांसाठी झाला आहे. विकृत राजकारण करीत राहिलो तर आपलं आणि देशाचं काही खरं नाही. मी सत्तेसाठी हपापलेलो नाही.  कोरोना काळातही राजकारण करणे हे विकृतीकरण आहे, अशा कानपिचक्या त्यांनी भाजपला दिल्या.  मी घराबाहेर पडत नाही अशी टीका होते. घराबाहेर न पडता इतके काम होत असेल तर बाहेर पडल्यास काय होईल? तेही मी करणार आहे,’ असेही ते म्हणाले

स्वबळ हवे ते न्याय्य हक्कांसाठी

स्वबळ, आत्मबळ तर आमच्याकडे आहेच. शिवसेनाप्रमुखांनी ते आम्हाला दिले. आम्हीही स्वबळावर लढू पण आमचा स्वबळाचा अर्थ केवळ निवडणूक अन् सत्ताप्राप्तीसाठी नाही. लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी तलवार उचलण्याची ताकद हे आमचे स्वबळ आहे.-  उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

सेना भवनासमोरील राड्याबाबत

शिवसेना भवनसमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या राड्याचा उल्लेख न करता ठाकरे म्हणाले की, कोणी फटकन आवाज काढला तर तुम्ही काडकन आवाज काढला पाहिजे या शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाचे मेसेज फिरताहेत. रक्तपात करणे हा आमचा गुणधर्म नाही. रक्तदान करणारे शिवसैनिक ही आमची ओळख.

शिवसेनेचं गाव, कोरोनामुक्त गाव

‘शिवसेनेचं गाव, कोरोनामुक्त गाव’, ‘शिवसेनेचा प्रभाग, कोरोनामुक्त प्रभाग’ अशी मोहीम शिवसैनिक आता गावोगावी राबवतील अशी घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी प्रास्ताविकात केली. आशा वर्कर्सचा आदर्श ठेवून शिवसैनिकांनी कोरोनाचा मुकाबला करावा, असे ते म्हणाले. 

प्रादेशिक अस्मिता हवीच

ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा दिला. हिंदुत्व ही काही कंपनी नाही की कोण्या एकाचे पेटेंट नाही. आमच्यासाठी आधी देश महत्त्वाचा आहे पण प्रादेशिक अस्मिताही तेवढीच महत्त्वाची आहे.  पश्चिम बंगालच्या मतदारांनी, ममता बॅनर्जींनी हीच अस्मिता दाखवून दिली, असेही ते म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारभाजपाकाँग्रेस