'त्या' रुग्णांची झिका व्हायरससाठी चाचणी करण्यात येणार; राज्यातील आरोग्य यंत्रणा सर्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 13:28 IST2021-08-05T13:28:13+5:302021-08-05T13:28:38+5:30
महाराष्ट्रात डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांमध्ये निगेटिव्ह येणाऱ्या रुग्णांची तपासणी झिका व्हायरससाठी करण्यात येणार आहे.

'त्या' रुग्णांची झिका व्हायरससाठी चाचणी करण्यात येणार; राज्यातील आरोग्य यंत्रणा सर्तक
मुंबई : ताप आलेल्या रुग्णांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांमध्ये ज्या रुग्णांची चाचणी ही निगेटिव्ह येईल, अशा रुग्णांची झिका व्हायरससाठी चाचणी करण्यात येणार आहे, तसेच या रुग्णांचे सातत्याने निरीक्षणही करण्यात येणार आहे.या रुग्णांच्या माध्यमातून नवनवीन व्हायरल इन्फेक्शनची प्रकरणे समोर येत नाहीत ना, याबाबतची तपासणी करण्यात येईल. राज्यातील प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. राज्यात सध्या झिका विषाणूचा तपास करण्यासाठी एकूण ५७ प्रयोगशाळांचे नेटवर्क सज्ज आहे. त्यापैकी सहा प्रयोगशाळा या देशात आहेत.
राज्यातील प्रयोगशाळांमध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर), कस्तुरबा हॉस्पिटल (मुंबई) आणि हाफकिन इन्स्टिट्यूट (मुंबई) या ठिकाणांचा समावेश आहे, तर आणखी तीन शासकीय प्रयोगशाळांची नेमणूक झिका व्हायरसच्या प्रयोगशाळेसाठी होणार आहे, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही)ची नेमणूक झिका विषाणू चाचणीसाठी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातडेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांमध्ये निगेटिव्ह येणाऱ्या रुग्णांची तपासणी झिका व्हायरससाठी करण्यात येणार आहे. नियमित आजारांच्या चाचण्यांसोबत या प्रयोगशाळांमध्ये झिका व्हायरससाठीची चाचणी होणार आहे. एनआयव्हीच्या माध्यमातून आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी या वैद्यकीय प्रयोगशाळेला उपकरणे पुरविण्यात येणार आहेत.
डासांमधील एडिस जातीच्या डासांपासून झिका व्हायरसचा संसर्ग होतो, तसेच डेंग्यू आणि चिकनगुनिया व्हायरसच्या माध्यमातूनही हा आजार पसरतो, म्हणूनच झिकाचा संसर्ग तपासण्यासाठी आता डेंग्यू आणि चिकनगुनिया चाचणी निगेटिव्ह आलेल्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत, तसेच झिकाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत.
देशात झिका व्हायरसची चाचणी करण्यासाठी केंद्रातील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची दिल्ली स्थित नॅशनल सेंटर फॉर डिझिज कंट्रोल आणि पुणेस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांसारख्या संस्था मुख्यत्वेकरून झिकाच्या संसर्गावर लक्ष ठेवून आहेत. झिकाची चाचणी करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. सध्या झिकाची चाचणी ही खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत नाही.