दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात -मुंबई उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 06:21 IST2025-04-15T06:20:38+5:302025-04-15T06:21:52+5:30

Bombay Bigh Court on Adoption: ‘त्या दाम्पत्याला समाधान मिळणार असेल, त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण होणार असेल तर हरकत कशाला ?’

Parents of two disabled children can adopt a third child - Bombay High Court | दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात -मुंबई उच्च न्यायालय

दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात -मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : दोन दिव्यांग मुलांचे पालक जर तिसऱ्या सामान्य मुलाला दत्तक घेत असतील तर त्यात काहीही गैर नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने मुंबईतील एका दाम्पत्याच्या अर्जावर सहा आठवड्यांत पुनर्विचार करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले.

या दाम्पत्याला दोन दिव्यांग मुले असताना तिसरे सामान्य मूल दत्तक घेण्याची परवानगी नाकारण्याचा सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी (कारा)चा निर्णय उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये रद्द केला. मात्र, काराने २०२३च्या आदेशाचे पालन करत संबंधित दाम्पत्याला तिसरे मूल दत्तक घेण्यास नकार दिला. 

दोन दिव्यांग मुले असलेले जोडपे तिसरे सामान्य मूल दत्तक घेऊ शकते, असे न्यायालयाने नमूद केले. जर  कुटुंबात एका अतिरिक्त सदस्याला स्वीकारून  त्यांना समाधान मिळणार असेल, त्यांचे आयुष्य अधिक अर्थपूर्ण होणार असेल तर तिसरे सामान्य मूल दत्तक घेण्यात काहीही गैर नाही, असे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने ७ एप्रिलच्या आदेशात म्हटले आहे.

तसा कायदा नाही!

दोन दिव्यांग मुले असलेल्या दाम्पत्याला सामान्य मूल दत्तक घेण्यापासून रोखावे, असा कायदा नाही. मानवी जीवन हे एक आकांक्षा, अपेक्षा आणि आव्हानांची एक मिश्र पिशवी आहे. 

मुलांसोबतचे खोल रुजलेले नाते पालकांच्या अर्थपूर्ण जीवनामध्ये योगदान देते, असे न्यायालयाने म्हटले. 

प्रकरण काय?

एक सामान्य मूल दत्तक घेण्यासाठी संबंधित दाम्पत्याने २०२० मध्ये काराच्या पोर्टलवर नोंदणी केली. त्यावेळी मूल दत्तक घेण्यासंबंधीचे २०१७चे नियम लागू होते. 

मात्र, २२ सप्टेंबर २०२२ मध्ये नवे नियम लागू करून सरकारने दोन मुले असलेल्या पालकांना केवळ ‘विशेष परिस्थितीत’ मूल दत्तक देण्याची परवानगी दिली. 

त्यामुळे संबंधित दाम्पत्याला मूल दत्तक देण्यास नकार देण्यात आला. मात्र, जोडप्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना २०१७चे नियम लागू होतात.

Web Title: Parents of two disabled children can adopt a third child - Bombay High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.