‘नाही तर पेंग्विन सेना, घरात बसून ‘गणपत वाण्या’सारखी नुसतीच स्वप्न बघणार’ आशिष शेलारांचा बोचरा वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 13:48 IST2022-10-18T13:47:26+5:302022-10-18T13:48:28+5:30
Ashish Shelar News: भाजपाने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या ३९७ जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर एक आहोत, हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिले. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो

‘नाही तर पेंग्विन सेना, घरात बसून ‘गणपत वाण्या’सारखी नुसतीच स्वप्न बघणार’ आशिष शेलारांचा बोचरा वार
मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून भाजपाने उमेदवार मागे घेतल्यानंतर भाजपाच्या या निर्णयाची चौफैर खिल्ली उडवली जात आहे. मात्र काल लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ग्रामपंचायतीच्या ३९७ जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच एक नंबर असल्याचं दाखवून दिलं आहे. ‘नाही तर पेंग्विन सेना, घरात बसून ‘गणपत वाण्या’सारखी नुसतीच स्वप्न बघणार’ असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
काल लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनंतर आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचणारे ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, भाजपाने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या ३९७ जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर एक आहोत, हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिले. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो. नाही तर पेग्विन सेना, घरात बसून "गणपत वाण्या" सारखी नुसतीच स्वप्न बघणार, असा चिमटा आशिष शेलार यांनी काढला.
या ट्विटच्या दुसऱ्या भागात ते म्हणाले की, सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला "गणपत वाणी" आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना, याची खात्री करून पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले!“अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ!”, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लगावला.
दरम्यान, भाजपाकडून दावा करण्यात येत असलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील ११०० ग्रामपंचायतींपैकी ३९७ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाच्या पॅनेलनी बाजी मारली आहे. तर काँग्रेसला १०४, राष्ट्रवादी काँग्रेसला ९८, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ८७ आणि शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ८१ जागा मिळाल्याचा समोर येत आहे.