Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्हीही राज ठाकरेंच्या घरी जाणार आहात का?'; पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 11:05 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदेगट आणि भाजपाच्या नेत्यांकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी घेतल्या जात आहेत. याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गुरुवारी 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. 

एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले व ठाकरे यांच्याशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली.  मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व आहे. राजकीय चर्चा झाली नाही, जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी माध्यमांकडे दिले.

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या या भेटीवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या घरी विविध नेते जाताय, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. यावर आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे. आपण अनेकांच्या घरी जाऊन भेट घेतो. त्यात वाईट वाटायचं कारण काय?, असं अजित पवार म्हणाले. 

अजित पवारांना तुम्हीही राज ठाकरेंच्या घरी जाणार आहात का?, असा सवाल विचारला. त्यावर सध्यातरी माझा काही असा प्लॅन नाहीय. परंतु राज ठाकरे आणि माझी अनेकदा भेट झालीय. आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. आमचे राजकीय मतभेद असू शकतात, मात्र मैत्रिचे संबंध देखील असतात, असं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

दरम्यान, या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट होती. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून ही भेट घडली. या भेटीत आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सानिध्यात काम केले आहे. राजसाहेबांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनात राज्यभर काम केले आहे त्यामुळे या भेटीत बऱ्याच जुन्या आठवणी चर्चेत आल्या असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला-

लाडके मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवते. जी संधी मिळाली त्याचे सोनं करण्यासाठी काम सुरू आहे. आमचं मंत्रिमंडळ सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे आहे हे जनतेला दिसत आहे. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत धडाडीचे निर्णय आमच्या सरकारने घेतले आहेत असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला. वरळीतील बॅनरवरून एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी उत्तर दिले.   

टॅग्स :राज ठाकरेअजित पवारएकनाथ शिंदेमनसेभाजपा