सेनेचा विरोध अन् स्वपक्षातील नाराजी किरीट सोमय्यांना नडली!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:47 AM2019-04-04T05:47:03+5:302019-04-04T13:03:08+5:30

सोमय्या यांनी २०१४ पूर्वी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला होता. एवढेच नव्हे तर काही घोटाळ्यांच्या निमित्ताने भाजपाच्या काही नेत्यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले होते.

Opposed the army and the angry Kirit Somaiya was angry! | सेनेचा विरोध अन् स्वपक्षातील नाराजी किरीट सोमय्यांना नडली!

सेनेचा विरोध अन् स्वपक्षातील नाराजी किरीट सोमय्यांना नडली!

Next

यदु जोशी 

मुंबई : केवळ शिवसेनेने विरोध केला म्हणून ईशान्य मुंबईचे विद्यमान भाजप खासदार किरीट सोमय्या यांचे तिकीट कापले गेले नाही, तर पक्षाला अडचणीचा ठरू शकणारा नेता ही प्रतिमाच त्यांना नडली असे दिसते.

सोमय्या यांनी २०१४ पूर्वी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला होता. एवढेच नव्हे तर काही घोटाळ्यांच्या निमित्ताने भाजपाच्या काही नेत्यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले होते. त्यामुळे सोमय्यांच्या उमेदवारीसाठी दिल्लीत वजन राखून असलेला भाजपाचा एकही नेता समोर आला नाही. पक्षाने काही घोटाळ्यांबाबत जी भूमिका ठरविली होती तिच्या विपर्यस्त भूमिका सोमय्या घेत राहिले. नंतरच्या काळात त्यांच्या हे लक्षात आले असावे म्हणून की काय त्यांनी मौन बाळगणे पसंत केले, पण तोपर्यंत ते स्वपक्षीयांच्या ‘बॅडबुक’मध्ये ते गेले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांचाही पाठिंबा सोमय्यांना मिळू शकला नाही. शिवाय, एखाद्या वेळी ते आपल्याच पक्षातील एखाद्या नेत्यावर उलटू शकतील ही स्वत:बाबतची साशंकता सोमय्या यांना दूर करता आली नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कथित घोटाळ्यांकडेही त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अंगुलीनिर्देश केला. विशिष्ट चौकशी यंत्रणेकडे त्याबाबतची माहिती पुरविण्यामागे सोमय्याच होते, असा संशय त्यातून निर्माण झाला. तेव्हापासून ते शिवसेनेचे लक्ष्य बनले आणि त्याचेच भांडवल भाजपमधील काही नेत्यांनी केले. शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सोमय्यांचा गेम तर केला गेला असा ‘प्रकाश’ आता या विषयावर टाकला जात आहे.

मनोज कोटक हे भाजपाचे महापालिकेतील पक्षनेते आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी मुलुंडमधून सरदार तारासिंग यांच्या जागी उमेदवारी मागितली. त्यावर तारासिंग चांगलेच भडकले. त्यामुळे मनोज कोटक यांना भांडूप पश्चिममधून उभे करण्यात आले. तेथे त्यांचा पराभव झाला होता. आता राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्याशी त्यांचा सामना असेल.
प्रवीण छेडा, मंत्री प्रकाश मेहता, आ. प्रसाद लाड यांच्या नावाचीही या जागेसाठी चर्चा होती. मुंबईतील तीन जागांवर भाजपाने एक मराठी (पूनम महाजन), एक दाक्षिणात्य (गोपाळ शेट्टी) आणि एक गुजराती (मनोज कोटक) असे संतुलन साधले आहे.

रावसाहेब दानवे आणि रावेरमध्ये रक्षा खडसेंना असलेला शिवसेनेचा विरोध भाजपाने झुगारला. परंतु, सोमय्यांच्या बाबतीत का झाले नाही? आपल्यासाठी उद्धव ठाकरेंकडे कोणी शब्द टाकेल असे ‘गुडविल’ सोमय्या पक्षातच तयार करू शकले नाहीत.

Web Title: Opposed the army and the angry Kirit Somaiya was angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.