opponents protest against Vikhe-Patil & jaidutta Kshirsagar at assembly session | आयाराम, गयाराम...जय श्री राम; विरोधकांचा विखे-पाटील, क्षीरसागरांना टोला 
आयाराम, गयाराम...जय श्री राम; विरोधकांचा विखे-पाटील, क्षीरसागरांना टोला 

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानभवनात प्रवेश केला. यावेळी विरोधकांनी प्रामुख्याने विरोधी पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना टार्गेट केले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आयाराम, गयाराम..जय श्री राम अशा आशयाचे पोस्टर हातात घेत घोषणाबाजी केली. विरोधकांच्या या घोषणाबाजीचे लक्ष्य राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना करण्यात आले. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन नाराज झालेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा देत सत्ताधारी भाजपाच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्रिपदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मराठवाड्यातील नेते जयदत्त क्षीरसागर यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला. रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जयदत्त क्षीरसागर यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना रोजगार हमी खातं देण्यात आलं. त्यामुळे विरोधी बाकांवरुन सत्ताधारी बाकांवर उड्या मारणाऱ्या या नेत्यांविरोधात विरोधी पक्षातील आमदारांनी घोषणाबाजी केली. 

आले रे आले, चोरटे आले" 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत दाखल होताच विरोधकांनी घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि विरोधक आमनेसामने आल्याने मुख्यमंत्र्याविरोधात विरोधी पक्षातील आमदारांनी आले रे आले चोरटे आले अशा घोषणा दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नाराज नेत्यांना भाजपात सामाविष्ट करुन घेण्यात आले. काँग्रेसमधील विखे-पाटील आणि राष्ट्रवादीतील मोहिते-पाटील घराणे फोडून या दिग्गज नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आलं.   


आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोरांना भाजपात प्रवेश देऊन थेट मंत्रिपद बहाल करण्याचं राजकारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळलं आहे. त्यामुळे विरोधकांना कमकुवत करण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी कितपत यशस्वी होणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीच्याआधीही अनेक नेते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला रंगत येणार यात शंका नाही 
 


Web Title: opponents protest against Vikhe-Patil & jaidutta Kshirsagar at assembly session
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.