"केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे कुबड्यांवर सरकार चालवत आहेत आणि दुसऱ्यांना कुबड्यांशिवाय लढू शकत नाही असे म्हणतात. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, यालाच म्हणतात, शी...शी...", अशा शब्दात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांच्यावर टीकेची तोफ डागली.
आशिष शेलार यांनी ठाकरेंची शिवसेना आता आम्हाला औरंगजेब फॅन क्लबपासून तोडू नका असा आर्जव करतेय. एमएमसी काँग्रेस म्हणजे मुस्लिम लिग, माओवादी अजेंड्यामध्ये आम्हाला ही घ्या, दूर ढकलू नका, असे उबाठा सेना काँग्रेसला सांगतेय, अशी टीका केली. शेलारांच्या टीकेला खासदार वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिले आहे.
"वाजपेयी, अडवाणींच्या पिल्लावळीला मराठी माणसाचे दुःख कधीपासून वाटू लागले?"
वर्षा गायकवाड शेलारांना उत्तर देताना म्हणाल्या, "स्वतः कुबड्यांवर उभे असलेले दुसऱ्यांना लंगडे म्हणतात. आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला " ही म्हण महाराष्ट्राला आज आशिष शेलार यांच्या या पोस्टला वाचून आठवली असेल. दुसऱ्याच्या अंगात किती बळ आहे याच्याआधी आपल्या संरक्षणासाठी निवडणूक आयोगाचे बळ लागते हे पहा. १९७७ साली मोरारजी देसाई (ज्यांनी गोळ्या झाडण्याचे आदेश दिले) यांच्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी का सामील झाले होते? आता वाजपेयी आणि अडवाणींच्या पिल्लावळीला मराठी माणसाचे दुःख कधीपासून वाटू लागले?", असा सवाल गायकवाड यांनी शेलारांना केला.
"महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आदेशाने जात असताना मूग गिळून गप्प बसणा-या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणसाचे रोजगार गुजरातला जात आहेत हे आठवले नाही. केंद्रात आणि राज्यात दोन्ही कडे कुबड्यांवर सरकार चालवत आहेत आणि दुसऱ्यांना कुबड्यांशिवाय लढू शकत नाही असे म्हणतात. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, यालाच म्हणतात, शी...शी...", अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.
शिंदे-पवारांविरोधातच ऑपरेशन कमळ
"आजवर ज्यांच्या कुबड्या घेऊन सत्तेत आले त्यांना नंतर गरज संपल्यावर फेकून दिले ही भाजपाची गरज सरो वैद्य मरो ही प्रवृत्ती आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ करुन त्यांचा घात करणारे तुम्हीच! आता हे दोन्ही वैद्य पक्षही आपला राहिलेला काळ मोजत आहेत", अस म्हणत वर्षा गायकवाडांनी महायुतीतील अंतर्गत कलहावर बोट ठेवले.
"महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने बोंब मारायची आणि बिहारमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन भाषणे ठोकायची. वीस वर्षे सत्ता असताना नाव का नाही बदलले. बिहारमध्ये औरंगजेब फॅन क्लब चालवत आहात काय? बरं! त्या मुस्लिम लीग विरोधात काँग्रेस पक्ष स्वातंत्र्य पूर्व काळात लढत असताना, मुस्लिम लीग बरोबर सत्ता स्थापन कोणी केली? म्हणूनच मुस्लिम लीग बद्दल आणि जीनाबद्दल तुम्हाला परंपरागत प्रेम आहे! अडवाणी जीनाबद्दल काय म्हणाले होते, आठवतं ना?", असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी शेलारांना केला आहे.
जनता तुम्हाला एसबी पक्ष का म्हणते?
"स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारा, देशाला संविधान आणि लोकशाही अर्पण करणारा व भारतात लोकशाही रुजवणारा काँग्रेस पक्ष आहे. तुम्ही संविधानाचा विरोध करणारे, तिरंग्याला अशुभ म्हणणारे आणि तिरंगा ५२ वर्षे कार्यालयावर न फडकावणारे आहात. काँग्रेस पक्षाला तुम्ही एम एम सी म्हटले तरी जनतेला ते पटणार नाही. परंतु मनुवादी असलेल्या तुम्हाला *एसबी* पक्ष जनता का म्हणत आली? याचा विचार करा", असे उत्तर वर्षा गायकवाड यांनी शेलारांना दिले.
Web Summary : Varsha Gaikwad criticized BJP for hypocrisy, questioning their alliances and past actions. She accused them of undermining Maharashtra's interests and plotting against allies like Shinde and Pawar, highlighting internal conflicts within the ruling coalition.
Web Summary : वर्षा गायकवाड़ ने भाजपा पर पाखंड का आरोप लगाया, उनके गठबंधनों और अतीत पर सवाल उठाए। उन्होंने महाराष्ट्र के हितों को कमजोर करने और शिंदे-पवार जैसे सहयोगियों के खिलाफ साजिश रचने का आरोप लगाया, सत्तारूढ़ गठबंधन के भीतर आंतरिक संघर्षों पर प्रकाश डाला।