Join us  

"... तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होणार"; उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 3:44 PM

शिरुर मतदारसंघाील निवडणूक रंगतदार होणार असून खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिरुर मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून गतवर्षी अजित पवार यांच्या मान्यतेमुळे डॉ. अमोल कोल्हेंना तिकीट मिळालं. मात्र, अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. अनेकदा त्यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणाही साधला. आता, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी गतवर्षीचे शिवसेना उमेदवार आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत निवडमुकांच्या मैदानात उतरवले आहे. 

शिरुर मतदारसंघाील निवडणूक रंगतदार होणार असून खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज शिरुरमधील खेड मतदारसंघाचा दौरा केला. येथील राष्ट्रवादीचे नेते  दिलीप मोहिते पाटील यांनी कायम शिवाजीराव पाटील यांचा कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे, पाटील यांच्या उमेदवारीवरुन त्यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांनी दिलीप मोहिते यांची भेट घेतली. यावेळी, आयोजित बैठकीतून उपस्थितांशी संवादही साधला. येथे मार्गदर्शन करत असताना अजित पवारांच्या नावाने मुख्यमंत्री होण्याच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी, अजित पवारांनाही कार्यकर्त्यांच्या घोषणांना प्रतिसाद देत, जेव्हा दिलीप मोहिते मंत्री होतील, तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होईल, असे विधान केले. 

अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठीी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते आग्रही आहेत. अनेकदा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चाही रंगल्या होत्या. विशेष म्हणजे महायुतीत समावेश झाल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशाही चर्चा रंगल्या. मात्र, विद्यमान महायुती सरकाराचा कार्यकाळ संपेपर्यंत एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडूनही अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असतात, तसे स्वप्नही ते बाळगात. त्यातूनच, खेड येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री संबोधित करत भावना व्यक्त केल्या. त्यावेळी, अजित पवारांनी दिलीप मोहिते पाटील यांचा मंत्री उल्लेख करतच, आपल्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केले. 

दिलीप मोहितेचं अजित पवारांकडून कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटील यांना तीव्र विरोध केला होता. आता अजित पवार यांच्या मध्यस्तीनंतर मोहिते पाटील यांनीही राजीखुशी दर्शवली आहे. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील यांची लोकसभा उमेदवारी निश्चित मानली जात असून येथे शिवाजी पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना रंगणार आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना यंदा निवडणुकीत पराभव करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळेच, आज खेड मतदारसंघात जाऊन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिलीप मोहिते पाटलांचे कौतुक केले. तसेच, आगामी लोकसभेसाठी पक्षाची भूमिकाही विशद केली.  

टॅग्स :अजित पवारशिरुरडॉ अमोल कोल्हेमुख्यमंत्रीराष्ट्रवादी काँग्रेस