‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:29 IST2025-12-31T12:28:44+5:302025-12-31T12:29:03+5:30
भांडुपच्या गणेशनगर परिसरात राहणारे प्रशांत शिंदे कुटुंबासोबत राहायचे. ते एकटेच कमावते होते. रात्री नेहमीप्रमाणे कामावरून रात्री घरी येताना त्यानी पत्नीला फोन केला. भाजी कोणती आणू, याबाबत विचारले. मात्र, तिचे उत्तर येण्याआधीच अनियंत्रित बेस्टने त्याला चिरडले.

‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
मनीषा म्हात्रे -
मुंबई : नेहमीप्रमाणे कामावरून परतताना त्यांनी पत्नीला कॉल केला. भाजीला काय आणू? विचारले. तिचे उत्तर येण्याआधीच, त्याची किंकाळी पत्नीच्या कानी पडली. क्षणार्धात वाहतूक वार्डन प्रशांत शिंदे यांच्या मृत्यूने, हसते खेळते कुटुंब भांडुपच्या बेस्टअपघातात उद्ध्वस्त झाले आहे. तर, कुठे आधार हरपला, तर कुठे मायेचे छत्र हरपल्याने शोककळा पसरली आहे.
भांडुपच्या गणेशनगर परिसरात राहणारे प्रशांत शिंदे कुटुंबासोबत राहायचे. ते एकटेच कमावते होते. रात्री नेहमीप्रमाणे कामावरून रात्री घरी येताना त्यानी पत्नीला फोन केला. भाजी कोणती आणू, याबाबत विचारले. मात्र, तिचे उत्तर येण्याआधीच अनियंत्रित बेस्टने त्याला चिरडले.
इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णयच आमच्या जीवावर
बस अपघातात प्रणिता संदीप रासम यांचा मृत्यू झाला असून, त्यांना एक मुलगा दुसरीमध्ये आणि एक मुलगी सहावीत शिकत आहे. त्या मुलीसह दादरच्या डान्स क्लासमधून घरी येताना हा अपघात झाला. त्या पती आणि दोन्ही मुलांसह साईनगर भांडुप पश्चिम येथे राहात होत्या. अरुंद रस्त्यावर मिनी बस हटवून मोठ्या, इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय या अपघाताचे मूळ कारण आहे. त्यात चालकाचा बेदरकारपणा पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, असे प्रणिता यांचे पती संदीप यांनी म्हटले आहे.
कामावरून परतताना ‘तिला’ मृत्यूने गाठले
सायन रुग्णालयात वरिष्ठ परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या मानसी गुरुव यांच्या नातेवाइकांनीही या अपघातास वाहतूक पोलिस आणि बेस्ट प्रशासनास जबाबदार धरले. मानसी यांना दोन मुली आहेत. त्या बारावी आणि अकरावीत शिक्षण घेत आहेत. घरी परतताना मृत्यूने गाठल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
बहिणीच्या विवाहानंतर कामावर जाण्यासाठी आली आणि...
साताऱ्याला चुलत बहिणीच्या विवाह सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी कामावर जायचे म्हणून आई आणि बहिणीला गावी ठेवून वर्षा सावंत भांडूपच्या घरी येण्यासाठी निघाली. नेहमी ७ वाजता येणारी एसटीही उशिराने आली. तेथून कसेबसे भांडूप स्टेशन गाठले आणि बाहेर पडताच मृत्यूने गाठल्याने कुटुंबीयांना धक्का बसला.
लग्नात मजा मस्ती, धडपड करणाऱ्या बहिणीच्या अंत्यविधीला येण्याची वेळ ओढवल्याने संपूर्ण गावांत शोककळा पसरली आहे. टेंभीपाडा, रावते कंपाउंड येथील भक्ती प्रसाद चाळीत राहणारी वर्षा नुकतीच टाटा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. यापूर्वी ती सायन रुग्णालयात काम करत होती. वर्षा मूळची साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कोकराळे गावची रहिवासी आहे.
साताऱ्याहून ती एसटीने ठाण्यात उतरली. एरवी सात वाजता येणारी एसटीलाही उशीर झाला. तेथून स्टेशनने भांडूप स्थानक गाठले. घरी जाण्यासाठी बेस्टच्या रांगेत उभी असताना या अपघातात तीही चिरडली गेली.