'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:51 IST2025-12-25T09:50:34+5:302025-12-25T09:51:50+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray: उद्धवसेना आणि मनसे यांची युती जाहीर झाली. या युतीनंतर भाजपकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना घेरण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. भाजपने आता थेट मतांचे गणित मांडले आहे.

'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Elections: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली. या घोषणेनंतर भाजपकडून दोन्ही भावांना घेरले जात असल्याचे दिसत आहे. मनसे-उद्धवसेना युतीचा मुंबई महापालिका निवडणुकीत फार परिणाम होणार नाही, असे दावे भाजपकडून केले जात आहेत. भाजपकडून आता मुंबई महापालिका निवडणुकीतील मतांचे गणितही मांडण्यात आले आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी 'मनसे–उबाठा युती म्हणजे, आषाढीच्या घरी महाशिवरात्र! किंवा ग्रामीण म्हणीत सांगायचं तर उघड्याशेजारी दुसरा उघडं गेल, रातभर थंडीने काकडून मेल…", अशी खिल्ली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची उडवली आहे.
भावनेनं मतपेटी भरत नाही
केशव उपाध्ये म्हणाले, "दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे.
कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत."
"थोडं वास्तव पाहूया… फक्त मुंबईची आकडेवारी. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजपा मुंबईत क्रमांक १ चा पक्ष आहे. सर्वाधिक आमदार भाजपाचे निवडून येतात. लोकसभेत भाजपा–सेना युती विरुद्ध उबाठा–मविआ अशी लढत होती", असेही उपाध्ये म्हणाले आहेत.
भाजपने मांडले मतांचे गणित
मुंबईत
भाजपा, मते – 15,30,853
शिवसेना, मते – 11,43,380
महायुतीची एकत्रित मते – 26,74,233
उबाठा – 16,94,326
कॉंग्रेस – 7,68,083
मविआची एकत्रित मते – 24,62,409
विधानसभा 2025 मध्ये मनसे स्वतंत्र लढली.
भाजपा – 18,90,931
शिवसेना – 10,09,083
महायुती – 29,00,020
उबाठा – 13,95,303
कॉंग्रेस – 6,82,532
मविआ – 20,77,835
मनसे – 4,10,735
आता हिशोब सरळ आहे.
उबाठा + मनसे = 18,02,678
असे गणित भाजप नेते केशव उपाध्ये यांनी मांडले आहे.
दोन शून्यांची बेरीज शून्यच असते
उपाध्ये यांनी पुढे म्हटले आहे की, "महापालिकेत उबाठा सोबत काँग्रेस नाही, फक्त उबाठा–मनसे युती आहे. आणि ही आकडेवारी थेट सांगते, ही मते भाजपाच्या मतांपेक्षा कमी आहेत. म्हणूनच राजकारणात लक्षात ठेवा. दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येकवेळी पूर्णांक होतातच असे नाही. किंबहुना, दोन शून्यांची बेरीज एका शून्याएवढीच असते", अशा शब्दात उपाध्ये यांनी मनसे-उद्धवसेना युतीवर निशाणा साधला आहे.