अवकाळी संपली, आता काहिली; कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर, उन्हाचे चटके कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 05:34 IST2026-03-22T05:34:05+5:302026-03-22T05:34:05+5:30
याच काळात महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील.

अवकाळी संपली, आता काहिली; कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर, उन्हाचे चटके कायम
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यभरातील हवामान बदलामुळे गेल्या तीन ते चार दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आलेला अवकाळी पावसाचा फेरा आता संपला असून, कमाल तापमानात वाढ होणार आहे.
राज्यभरातील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर जाणार असून, मुंबईचे कमाल तापमान ३६ वर जाईल. तर पुन्हा २५ एप्रिलनंतर पुणे, सोलापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागेल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.
हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ आणि २४ मार्च रोजी मुंबई, ठाण्यासह कोकणच्या काही भागांत हवामान उष्ण, दमट राहू शकते. याच काळात महाराष्ट्राच्या आतल्या भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा बऱ्यापैकी खाली आला आहे. ३६ आणि ३५ वर नोंदविले जाणारे कमाल तापमान ३१ ते ३२ वर आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी उन्हाचे चटके कायम आहेत.