New face for Congress against Ashish Shelar; Shiv Sena also ready! | आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस देणार नवा चेहरा; शिवसेनाही तयारीत!

आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस देणार नवा चेहरा; शिवसेनाही तयारीत!

खलील गिरकर

मुंबई : राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात त्यांच्यासमोर कुणाला उमेदवारी द्यावी या विवंचनेत विरोधी पक्ष आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये शेलार प्रथमच विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार म्हणून केलेल्या कामांच्या जोरावर या मतदारसंघात स्वत:चे स्थान भक्कम केले आहे.

सन १९९९, २००४ व २००९ अशा सलग विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी विजयी झालेल्या व राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या जियाऊद्दीन सिद्दीकी (बाबा सिद्दीकी) यांनी यावेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेससमोर नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेसतर्फे उमेदवारीची माळ स्थानिक नगरसेवक आसिफ झकेरिया यांच्या गळयात पडण्याची शक्यता आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढण्याची तयारी झकेरिया यांचीही तयारी आहे.

शिवसेनेकडून या मतदारसंघातून राहुल कनाल इच्छुक आहेत. सध्या शिवसेना-भाजप युतीचे वारे वाहात आहेत. मात्र यदाकदाचित युती झाली नाही तर निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ते सज्ज आहेत. युती बिनसलेली असतानाच्या काळात शेलार यांनी शिवसेनेला अंगावर घेण्याचे काम केले. विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला अधिकाधिक जागा मिळाव्या यासाठी शेलार यांनी जोरदार बांधणी केली होती. त्यामुळे युती न झाल्यास शेलारांविरोधात शिवसेना आक्रमक होऊ शकते. मनसे निवडणूक लढविणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मनसे रिंगणात उतरली तर या मतदारसंघात रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.

पाच वर्षांत काय घडले?
.वांद्रे पश्चिम हा उच्चभ्रूंचा मतदारसंघ मानला जातो. त्यांच्या समस्या सोडवण्यासोबत या मतदारसंघात असलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याला गती मिळाली आहे.
सांताक्रुझ भागात नेहमी पाणी साचण्याचा त्रास होत होता त्यासाठी गझदर बांध नाल्याचे, पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण या समस्येतून सुटका करण्यात आली आहे. लिंकिंग रोड, हिल रोड, वांद्रे स्टेशन रोड परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात बऱ्याच अंशी यश आले.
मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करण्यात आले. या ठिकाणी खेळाडू मोठ्या प्रमाणात राहतात त्यामुळे खेळाच्या विकासााठी पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

मतदारसंघातील नागरिकांनी माझे काम पाहिले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला मतदानरुपी आशीर्वाद देऊन विजयी करायचे याचा निर्णय जनतेने घेतला आहे.माझ्यावर नागरिकांनी नेहमी विश्वास ठेवला आहे व मी त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा नेहमी यशस्वी प्रयत्न केला आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आहे. - आशिष शेलार, विद्यमान आमदार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: New face for Congress against Ashish Shelar; Shiv Sena also ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.