राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का; माजी खासदार संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 19:52 IST2019-10-04T19:51:31+5:302019-10-04T19:52:31+5:30
संजय दिना पाटील हे 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील खासदार होते.

राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का; माजी खासदार संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा फटका मानला जात आहे. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश होत असल्याने शरद पवारांसाठी हे धक्कादायक आहे.
संजय दिना पाटील हे 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील खासदार होते. ईशान्य लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. मात्र 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. संजय दिना पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे मुलुंड, भाडुंप या भागात शिवसेनेला फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत संजय दिना पाटील यांना मानखुर्द भागातूनही चांगलं मताधिक्य मिळालं होतं.
Mumbai: Nationalist Congress Party (NCP) leader and former MP from Mumbai North East Constituency, Sanjay Dina Patil joins Shiv Sena in presence of party Chief Uddhav Thackeray. pic.twitter.com/JnBrTlNwwr
— ANI (@ANI) October 4, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतील चेहरा म्हणून सचिन अहिर आणि संजय दिना पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र या दोन्ही नेत्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याचं पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी करण्याचा भाजपा-शिवसेनेचा प्रयत्न आहे का? याबाबतही चर्चा सुरु आहे. कारण नवी मुंबईतील एनसीपीचे मोठे नेते गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे नवी मुंबई महापालिकेतील सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीकडून भाजपाकडे गेल्या आहेत. तसेच ठाण्यातही जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय कोणताही बडा नेता राष्ट्रवादीकडे नाही.
निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाचे अनेक मोठे नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपात गेले आहेत. यामध्ये उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, चित्रा वाघ, संदीप नाईक, गणेश नाईक, वैभव पिचड, राहुल नार्वेकर अशा अनेक राष्ट्रवादी नेत्यांना शिवसेना-भाजपात पक्षात घेतलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
आणि पाटील यांची वेळ चुकली...
संजय दिना पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची वेळ मातोश्रीवर संध्याकाळी 5 वाजताची होती. मात्र भाऊ नेहमीप्रमाणे उशीरा पोहचले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवालयाकडे रवाना झाले होते. पर्यायी त्यांनी रश्मी ठाकरेंसोबत फोटो काढून घड्याळाची टीक टीक बंद केली आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते पक्षप्रवेशासाठी ते शिवालय याठिकाणी रवाना झाले.