उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:04 IST2025-12-26T17:03:56+5:302025-12-26T17:04:04+5:30
Jayant Patil Meet Uddhav Thackeray AT Matoshree: मुंबईत मातोश्री निवासस्थानी जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत मुंबई मनपा निवडणुकीबाबत चर्चा केली.

उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
Jayant Patil Meet Uddhav Thackeray AT Matoshree: महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे जाहीर करताच ठाकरे बंधू यांनी युतीची घोषणा केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काही जागांचा प्रस्ताव ठाकरे बंधूंना दिला होता. मात्र, जागा सोडण्यास ठाकरे बंधू तयार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते काँग्रेससोबतही चर्चेला पोहचले होते. मात्र आता पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आमची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठीच मुद्दामहून आलो होतो. बरीचशी चर्चा झाली. पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. आम्ही महाविकास आघाडीतील घटक आहोत. मुंबईत आमची आणि उद्धवसेनेची आघाडी व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्रपणे मुंबईत लढावी, अशी आमची धारण होती. परंतु, ते दोन मोठे पक्ष आहेत. मुंबई शहरात त्या दोन पक्षांएवढी आमची ताकद नाही. म्हणून आम्ही उद्धवसेनेबाबत चर्चा करत आहोत. बरीचशी चर्चा सकारात्मक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक मागील वेळेस निवडून आले होते. त्या जागा आम्हाला सुटाव्यात, असे आमच्या पक्षाचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत आताच अधिक बोलणे योग्य होणार नाही. कारण चर्चा सुरू आहेत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करत असताना शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होतील, असा दावा केला जात आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे, असा काही लोकांचा प्रयत्न आहे. महापालिकेच्या निवडणुका ज्या शहरात शक्य आहेत, तिथे महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा प्रयत्न आहे. तो यशस्वी होईल. काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. काँग्रेस आणि आमची आधीपासूनच आघाडी आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते. मला दुःख वाटते की, त्यांनी आमचा पक्ष सोडला. प्रशांत जगताप यांनी आमच्या वतीने मागची विधानसभा लढण्यासाठी ठाकरे गटाने त्यांचा उमेदवार मागे घेतला होता. प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही आग्रहाने प्रयत्न केले होते. माझ्याशी चर्चा त्यांची आजपर्यंत झाली नाही. मध्यंतरी मुंबईत भेट झाली होती, तेव्हा चर्चा केली होती. प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडायला नको होता, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.