'हा कुठला न्याय?'; बारसूमधील स्थानिकांचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 03:07 PM2023-04-25T15:07:57+5:302023-04-25T15:08:11+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

NCP MLA Rohit Pawar criticized the Maharashtra government by tweeting a video. | 'हा कुठला न्याय?'; बारसूमधील स्थानिकांचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा सरकारला सवाल

'हा कुठला न्याय?'; बारसूमधील स्थानिकांचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा सरकारला सवाल

googlenewsNext

मुंबई/रत्नागिरी: रिफायनरीसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आसपासचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने बारसूच्या माळरानावर गोळा झाल्याने या भागात तणावाची स्थिती आहे. या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आंदोलनातील काही महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशा भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केल्या. 

बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून सुमारे ५ ते सहा हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही मरू गोळ्या खाऊ पण मागे हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, स्थानिकांना विश्वासात घेऊनच कोणताही प्रकल्प उभारणं आवश्यक असतं. पण हे सरकार बोलतं एक आणि करतं भलतंच, असं वारंवार दिसतंय..आजही बारसू ग्रामस्थांचा रिफायनरीला कडाडून विरोध असतानाही सरकार पोलिसी बळाचा वापर करून हा प्रकल्प त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतंय. हे योग्य नाही. एकीकडे सामान्यांचं सरकार आहे, असं म्हणायचं आणि दुसरीकडं याच सामान्यांना पोलिसांचा धाक दाखवून त्यांच्यावर दडपशाही करायची, हा कुठला न्याय?, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर बारसू येथील घटनास्थळावरील वातावरण शांत झाले आणि सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे काम प्रथम हाती घेण्यात आले. हे सर्वेक्षण नेमके किती दिवस चालेल, याची कोणतीच माहिती नसल्याने हा तणाव आणखी काही दिवस राहणार असल्याचे दिसत आहे.

पोलीस व्हॅनला अपघात; १६ पोलिस जखमी

बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वेक्षणाच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांचे वाहन अवघड वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाजूला उलटून १६ पोलिस अंमलदार किरकोळ जखमी झाले. आडिवरे गावाजवळील कशेळीकोंड येथील उतारावर सकाळी ही दुर्घटना घडली.

अटक केलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडी

रिफायनरी प्रकल्पाविरोधात लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावत असल्याच्या कारणावरून रत्नागिरी पोलिसांनी प्रकल्प विरोधक नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना अटक केली असून न्यायालयाकडून त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: NCP MLA Rohit Pawar criticized the Maharashtra government by tweeting a video.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.