Join us  

"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 1:57 PM

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गोपीनाथ पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. या काळात राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे, अशा शब्दांत पडळकर यांनी पवार यांना लक्ष्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. जितेंद्र आव्हाड एक मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, गोपीचंद पडळकर फार मोठ्या उंचीचे नेते आहे. मात्र उंचीचे नेत्यांचा कधीकधी तोल ढासळतो.

शरद पवार यांच्याबद्दल असं बोलायची महाराष्ट्रातील विरोधकांची देखील हिंमत झाली नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल, असा असा इशारा देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या लोकांविषयी जास्त न बोललेलं बर आहे. महाराष्ट्र त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडगोपीचंद पडळकरशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र सरकार