Join us  

'पाकिस्तानला चोरून प्रेमपत्र पाठवायची काय गरज?'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:41 PM

मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि पाकिस्तानचा भावनात्मक मुद्दा पेटवत ठेवायचा ही कूटनीती असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे

मुंबई - पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पाकिस्तान हा जर इतका बदमाश देश आहे तर मग त्याला हे चोरून प्रेमपत्र पाठवायची काय आवश्यकता आहे? असा सवाल आव्हाडांनी केला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी पत्र लिहलंय त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, पाकिस्तानला शुभेच्छा देण्यात गैर काहीच नाही. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना पाठिंबा द्यायचा थांबवलं, तर आपल्यालाही पाकिस्तानशी वैर ठेवण्यात काहीही रस नाही. उलट मैत्रीच हवी आहे. मात्र पाकिस्तानला शुभेच्छांचा संदेश भारतातर्फे पाठवला गेला हे आपल्याला भारत सरकारकडून कळलेलं नाही. तर पाकिस्तान कडून कळलं आहे. चाणाक्ष इम्रान खानने ट्विट करुन मोदी यांनी आपल्याला हा संदेश पाठवल्याचं जाहीर केलं. मग नरेंद्र मोदी यांनी हे जाहीर का केलं नाही ? या गोष्टीचा विचार केला तर मोदी यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. एकीकडे अहोरात्र पाकिस्तानच्या नावाने शिमगा करायचा आणि दुसरीकडे चोरुन लव्हलेटर पाठवत बसायचं हाच तो दुटप्पीपणा आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

पुलवामा आणि बालाकोट प्रकरणानंतर मोदी यांनी आपल्या भाषणांमधून पाकिस्तानबद्दल अहोरात्र गरळ ओकायला सुरुवात केली आहे. देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था अशा अनेक गंभीर प्रश्नांवर काही बोलण्याऐवजी मोदी फक्त आणि फक्त पाकिस्तानद्वेष व्यक्त करत आहेत. मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि पाकिस्तानचा भावनात्मक मुद्दा पेटवत ठेवायचा ही कूटनीती असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. 

पाच वर्षांपूर्वी मोदींनी शपथविधीला नवाज शरीफ यांना आमंत्रित केलं होतं. तसेच दौऱ्यावर असताना मध्येच विमान  इस्लामाबादला उतरवून नवाज शरीफ यांच्या घरी गेले होते. पाकिस्तान सारख्या वात्रट शेजाऱ्याशी आपण काय संबंध ठेवायचे यासाठी एक सुसूत्र धोरण हवं. मोदींनी मात्र पाकिस्तानचा वापर भारतीय जनतेच्या भावना भडकवून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केला. नरेंद्र मोदी केवळ सत्तेचे भुकेले आहेत असा आरोपही आव्हाडांनी पत्रात केला आहे.

ऐका - काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

 

टॅग्स :लोकसभा निवडणूकनरेंद्र मोदीजितेंद्र आव्हाडइम्रान खानभारतपाकिस्तान