मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 20:48 IST2019-12-29T20:47:32+5:302019-12-29T20:48:10+5:30

'आत्ताचे खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे'

ncp leader jayant patil reaction on maharashtra cabinet expnansion | मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे - जयंत पाटील

मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे - जयंत पाटील

मुंबई  : महिनाभरापासून रखडलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला असून सोमवारी, ३० डिसेंबर रोजी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जवळपास 36 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे आहेत, असे सांगितले.

जयंत पाटील म्हणाले, " मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे आहेत. सरकारमधील सर्व पक्षांचा विचार मुख्यमंत्री करतील आणि खातेवाटप जाहीर करतील. तसेच आत्ताचे खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे आहे. सरकारमधील सहा मंत्र्यांपैकी प्रत्येकाकडे पाच ते सात खाती आहेत. त्याचेही पुर्नवाटप मुख्यमंत्री लवकर जाहीर करतील." याचबरोबर, या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची राष्ट्रवादी काँग्रेसची यादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काही तासांत मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील. तसेच, गृहखाते कुणाकडे असेल हे विस्तारानंतरच कळेल, अशी माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली.  

दुसरीकडे, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी उद्या शपथविधी होणार असून काँग्रेसच्या मंत्र्यांची अंतिम यादी तयार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, ही यादी आज जाहीर करण्यात येणार असून काँग्रेसचे 12 मंत्री असणार आहेत, त्यापैकी 10 कॅबिनेट मंत्री असतील, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या 30 डिसेंबरला पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर तयारीही जोरदार सुरु आहे. मात्र उद्या मंत्रिमंडळ विस्तारात कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याची उत्सुकता सर्वांना आहे. 
याआधी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी तात्पुरते खाते वाटप करण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी, याविषयी उत्सुकता होती. 

मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे
शिवसेना : रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, तानाजी सावंत, अनिल परब, सुनील राऊत, बच्चू कडू, संजय शिरसाठ, प्रकाश आबिटकर, डॉ. संजय रायमुलकर, श्रीनिवास वनगा, उदय सामंत किंवा भास्कर जाधव, अनिल बाबर किंवा शंभूराज देसाई, नीलम गो-हे.

राष्ट्रवादी : अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, दिलीप बनकर, अनिल भाईदास पाटील, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, भरत भालके, रोहित पवार, दत्ता भरणे, संजयमामा शिंदे (विधानसभा उपाध्यक्ष: भारत भालके किंवा राजेश टोपे )

काँग्रेस : अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, संग्राम थोपटे, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजीत कदम किंवा प्रणिती शिंदे, असलम शेख किंवा अमीन पटेल. (सुनील केदार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी अनिश्चितता)

Web Title: ncp leader jayant patil reaction on maharashtra cabinet expnansion