मुंबई मनपा निवडणुकीसाठी नवाब मलिकांनी कंबर कसली; NCP पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 09:58 IST2025-08-21T09:56:46+5:302025-08-21T09:58:37+5:30
NCP Nawab Malik News: मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी नवाब मलिक यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई मनपा निवडणुकीसाठी नवाब मलिकांनी कंबर कसली; NCP पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका
NCP Nawab Malik News: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोपवली आहे. यानंतर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक कंबर कसून तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा समीर भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा दिला होता. तेव्हापासून मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे. राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्ष न नेमता समिती नेमली आहे. यानंतर नवाब मलिक चांगलेच कामाला लागले असून, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यावर भर देत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली.
मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर नवाब मलिक यांनी पक्षासाठी कंबर कसली आहे. पहिली बैठक व्यवस्थापन समितीची घेतल्यानंतर आज विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, विद्यार्थी, ओबीसी, सामाजिक न्याय, सहकार, असंघटित कामगार, हिंदी भाषिक, अल्पसंख्याक, झोपडपट्टी या सर्व सेलच्या प्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा हाती सोपवल्यावर नवाब मलिक अॅक्शन मोडवर आले असून व्यवस्थापन समितीची पहिली बैठक अलीकडेच झाली होती. मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी नवाब मलिक यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.