Nawab Malik : नवाब मलिकांना मुख्यमंत्री का वाचवतात?; मुंबई शहरात अज्ञातांनी लावले बॅनर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 13:06 IST2022-03-03T13:04:18+5:302022-03-03T13:06:00+5:30
Nawab Malik : अज्ञाताकडून मुंबईत लावण्यात आले बॅनर्स

Nawab Malik : नवाब मलिकांना मुख्यमंत्री का वाचवतात?; मुंबई शहरात अज्ञातांनी लावले बॅनर्स
Nawab Malik : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या आर्थिक गैरव्यवहाराची तपास करणाऱ्या ईडीने (ED) राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरही पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. यानंतर त्यांना पीएमएलए न्यायालयाने कोठडीही सुनावली होती. दरम्यान, आता हे प्रकरण अधिकच तापताना दिसत आहे. मुंबईत नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी बॅनरबाजी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत लावण्यात आलेला हा बॅनर कोणी लावला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु यामध्ये दोन बातम्यांचा संदर्भ देण्यात आला असून मुख्यमंत्री नवाब मलिक यांना का वाचवत आहेत असा प्रश्न करण्यात आलाय. तसंच मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
मंत्रिपदाचा राजीनामा नाही
अटक केलेले मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे. मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, असे महाविकास आघाडीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीचे मंत्री, नेते यांची बैठक झाली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हेही तेथे पोहोचले व बैठकीत सहभागी झाले. त्यानंतर सायंकाळी उशिरा ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. ममता बॅनर्जी यांनीही शरद पवार यांना दूरध्वनी करून मलिक यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केल्याचं पाहायला मिळालं होतं.