नेव्हीनगर, गोवंडीमधील शिवाजीनगर परिसर रडारवर! हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत; बांधकाम बंदीचा आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:31 IST2025-01-04T14:30:36+5:302025-01-04T14:31:14+5:30
...तेथील हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत आल्यास तिथेही बांधकाम बंदीचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला.

नेव्हीनगर, गोवंडीमधील शिवाजीनगर परिसर रडारवर! हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत; बांधकाम बंदीचा आयुक्तांचा इशारा
मुंबई : वाढत्या वायुप्रदूषणामुळे महापालिकेने बांधकामांवर बंदी घातल्यानंतर बोरीवली पूर्वेतील हवेचा दर्जा गेल्या तीन दिवसांत सुधारला आहे. भायखळा येथील बांधकामांवर पुढील २४ तास पालिकेकडून लक्ष ठेवले जाणार असून, तेथील प्रदूषण नियंत्रणात आल्यास या दोन्ही ठिकाणची बांधकाम बंदी मागे घेण्यात येईल. याशिवाय नेव्हीनगर आणि गोवंडीतील शिवाजीनगर या परिसरातील हवेच्या दर्जावर पुढील काही दिवस पालिका लक्ष ठेवणार आहे. तेथील हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत आल्यास तिथेही बांधकाम बंदीचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला.
गोवंडी येथील शिवाजीनगरमधील हवा दोन महिन्यांपासून अनेकदा वाईट श्रेणीत नोंदली गेली आहे. तेथे शुक्रवारीही सायंकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक २१२ होता. तर, नेव्हीनगर येथेही ‘वाईट’ हवेची नोंद असून, तेथे २६० इतका हवा निर्देशांक होता. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून, बिल्डरांनी तेथे आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने हवेत धूळ पसरण्याचे प्रमाण अधिक आहे. डेब्रिजची अवैध वाहतूक तसेच डम्पिंग ग्राउंडवरील कचरा जाळण्याचे वाढते प्रमाण यामुळे सतत प्रदूषण वाढत आहे.
यापूर्वीही अनेकदा शिवाजीनगरमधील हवेची ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंद झाली होती. आता पुन्हा तेथील हवा गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. विविध उपाययोजना करूनही या परिसरातील हवेच्या गुणवत्तेत फरक पडलेला नाही. त्यामुळे शिवाजीनगर येथील स्थानिकांना विशेषतः वयोवृद्ध आणि लहान मुलांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
सातत्याने सर्व भागांतील हवेच्या दर्जाचे निरीक्षण सुरू आहे. ज्या परिसरात हवेचा दर्जा ‘वाईट’ आहे, तेथे आवश्यक तेथे तपासणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना तातडीने दिल्या जात आहेत. मात्र, जिथे नियमांचे पालन होणार नाही तिथे कडक कारवाई केली जाईल. शासकीय व खासगी प्रकल्पांमध्ये कारवाई करताना भेदभाव केला जाणार नाही.
- भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महापालिका
४६२ बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस
- वाहतूक कोंडी आणि बांधकामे ही मुंबईतील प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. पालिकेने धूळ, धूर प्रदूषणावर नियंत्रणासाठी या आधीच २८ मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून सातत्याने या बांधकामाचा पाठपुरावा सुरू आहे.
- त्यात त्यांनी सर्व प्रकारच्या प्रकल्प आणि बांधकामाच्या विकासक आणि कंत्राटदारांना पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी) सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय जे विकासक आणि कंत्राटदार या नियमांचे पालन करत नाहीत त्यांना आधी इन्टिमेशन नोटीस, मग कारणे दाखवा आणि शेवटी काम थांबवण्याची नोटीस बजावली जात आहे.
- नोव्हेंबर २०२४ पासून ८५६ बांधकामांना कारणे दाखवा, तर ४६२ बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस दिली आहे.