Join us  

Nashik Oxygen Leak: “आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर…”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 4:55 PM

MNS Raj Thackeray Reaction on Nashik Oxygen Leakage Incident: ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबई – नाशिक येथील मनपा रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ निष्पाप रुग्णांचे जीव गेलेत. नाशिकच्या या दुर्घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दुर्घटनेवर भाष्य करत शोकमग्न असल्याचं म्हटलं आहे. त्याचसोबत या रुग्णांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणाही सरकारने केली आहे.

नाशिकच्या दुर्घटनेवर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं अशी मागणी त्यांनी केली आहे. (MNS Raj Thackeray Reaction on Nashik Hospital Oxygen Leakage Incident)

 ऑक्सिजन टाकीला नवा कॉक बसवण्यात येत होता, इतक्यात...; वाचा, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कशी घडली

मुख्यमंत्री काय म्हणाले?

कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे! अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

राज्यातील सर्व रुग्णालयांना दक्षता घेण्याच्या सूचना

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोनासंकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

 नाशिकमध्ये हाहाकार! ऑक्सिजन गळतीमुळं २२ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

'गेल्या २ महिन्यांतील आठवी घटना

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना प्रचंड धक्का देणारी आणि ह्रदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीला गळती लागून आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही आठवी घटना आहे. कुठं शॉर्ट सर्कीट होतं, कुठं लहान मुलांच्या हॉस्पीटलमध्ये मुलं दगावतात. तातडीने या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. रुग्णालयातील इतर रुग्णांच्या शिफ्टींगचं काम सुरक्षितपणे व्हायला हवं. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

...अन् माझी मम्मी कोंबडीसारखी फडफडून मेली; रुग्णालयाबाहेर लेकीचा आक्रोश

देवेंद्र फडणवीसांची मागणी

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नाशिकमध्ये जे घडले ते भयंकर आहे. या दुर्घटनेत २२ लोक मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती असून हे अतिशय वेदनादायी आहे. सद्यस्थितीत रुग्णालयातील इतर रुग्णांच्या मदतीसाठी प्राधान्य देण्यात यावे, गरज पडल्यास त्यांना इतरत्र हलवावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

 

टॅग्स :नाशिक ऑक्सिजन गळतीमनसेराज ठाकरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस