अरुंद रस्त्यांमुळे बेस्टच्या ताफ्यात छोट्या बस; बस डेपोंचा व्यावसायिक पुनर्विकास, थिएटरही होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 10:15 IST2025-04-26T10:15:25+5:302025-04-26T10:15:46+5:30
वांद्रे, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्त्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

अरुंद रस्त्यांमुळे बेस्टच्या ताफ्यात छोट्या बस; बस डेपोंचा व्यावसायिक पुनर्विकास, थिएटरही होणार
मुंबई : अरुंद रस्ते लक्षात घेता बेस्टच्या ताफ्यात छोट्या बसेसची खरेदी करावी, केंद्र सरकारकडून येणाऱ्या एन. कॅपच्या (नॅशनल क्लिन एअर पॉलिसी) निधीचा वापर त्यासाठी करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे बेस्टबाबत शुक्रवारी आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिंदे यांनी छोट्या बसची संकल्पना मांडली. फडणवीस म्हणाले की, मुंबईत प्रवास करताना जास्त ताटकळत थांबावे लागू नये, यासाठी नियोजन करावे. बसची संख्या वाढविण्यासोबत बस किती वेळात येणार, सध्या कुठे आहे, याची माहिती प्रवाशांना होण्यासाठीची यंत्रणा अधिक प्रभावी करावी. वांद्रे, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्त्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
डेपोंच्या पुनर्विकासात करमणूक केंद्राचाही विचार व्हावा, असे मंत्री शेलार म्हणाले. मराठी सिनेमाला उर्जितावस्था येण्यासाठी पाच ठिकाणी मराठी थिएटरची निर्मिती केल्यास यातूनही उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बेस्टवरील खर्चाचा भार कमी करण्यास प्रत्येक वर्षी मुंबई महापालिका मदत करते. मात्र, पालिका बजेटमध्ये ३ टक्के वाहतुकीसाठी राखीव तरतूद केली तर बेस्टला फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वातानुकूलित बसचे उद्घाटन
बेस्टच्या ताफ्यात ५०३ वातानुकूलित आणि पूर्ण इलेक्ट्रिकल बस दाखल झाल्या आहेत. यातील विक्रोळी ते मुंबई सेंट्रल या बसला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईसाठी २,१०० वातानुकूलित बसेसची खरेदी केली असून, यातील ५०३ बसेस मिळाल्या आहेत. आणखी २,४०० बसेस मागविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बेस्ट बसेसची स्थिती
२,७८३ बसेस सध्या बेस्टच्या ताफ्यात
८७५ इलेक्ट्रिक बसेस
७,००० बसेसची लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यकता
२०२७ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा बेस्टचा मानस
रिक्षा, मेट्रो, टॅक्सीपेक्षा कमी भाडे; भाडेवाढीची मागणी
जीपीएससाठी गुगलशी करणार करार
प्रवाशांना सध्या बस कुठे आहे, किती वेळात येईल, यानुसार प्रवासाचे नियोजन करण्यासाठी जीपीएस सिस्टीमचा उपयोग होणार आहे. यासाठी बेस्ट गुगलशी करार करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.