Join us

"...त्यानंतर आमदारकीची शपथ घ्यायची की नाही ठरवणार"; नाना पटोलेंनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:32 IST

महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार दिल्यानंतर नाना पटोले यांनी भाष्य केले.

Nana Patole : दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर शनिवारी दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडत असून नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात येत आहे. मात्र महाविकास आघाडीने या शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनातून बाहेर पडत आपण आज शपथ घेणार नसल्याचे जाहीर केलं आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर टीका करत याबाबत भाष्य केलं आहे. हे बहुमत जनतेचं आहे की निवडणूक आयोगाचे असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे.

गुरुवारी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. आज विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे. मात्र ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे आमदारांनी आज शपथ घेणार नसल्याचे म्हटलं आहे. या सभात्यागानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना शपथ घेण्याबाबत भाष्य केलं आहे.

"गावागावांमध्ये लोक उठाव करत आहेत उठाव करत आहेत. आम्ही निवडून आलेले लोक आहोत. पण आम्ही निवडून आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्या जनभावना त्या माध्यमातून आम्ही शपथ घ्यायची नाही हे ठरवलेलं नाही. शपथ घ्यायची की नाही याचा निर्णय आम्ही अजून घेतलेला नाही. इथून आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन चर्चा करणार आहोत आणि शरद पवार यांच्याशी बोलणार आहोत. या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा ठरवलेला आहे. महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेमधलं नाही. हे सरकार जर जनतेचे असतं तर आझाद मैदानावर राज्याभिषेकासारखा सोहळा करून जनतेचे करोडो रुपये खर्च केले नसते.  हे सरकार आपलाच आनंद व्यक्त करत आहे असं चित्र आपण पाहतो आहोत," अशी टीका नाना पटोलेंनी केली.

"एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत. नागपूरच्या भागात ६७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि शपथविधीचा राज्याभिषेकासारखा सोहळा महाराष्ट्रात होत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात सहभाग घेत असताना या सरकारचे आम्ही कौतुक करण्यासाठी आलेलो नाही. जनतेचा आवाज घेऊन आम्ही इथे आलो आहोत. लोकांची जी जनभावना आहे त्याचा आधार घेऊन शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शपथ घ्यायची की नाही हे आम्ही अजून ठरवलेलं नाही. या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू," असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीच्या दोन आमदारांनी घेतली शपथ

दरम्यान, एकीकडे महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेणार नसल्याचे म्हटलं असतानाच दोन आमदारांनी शपथ घेतली आहे. शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी शपथ घेतली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४नाना पटोलेउद्धव ठाकरेआदित्य ठाकरे