Join us

नामदेव जाधवांचा 'त्या' घराण्यांशी संबंध नाही; रोहित पवारांनी दिला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 17:40 IST

मराठा व ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जाधव हे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण खराब होऊ शकते.

मराठा आरक्षणाचे हिटलर हे शरद पवार असल्याचं मत प्रा. नामदेव जाधव यांनी व्यक्त केलं होतं. शरद पवार यांच्या प्रतिज्ञापत्रात ओबीसी असा उल्लेख असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी नामदेव जाधव हेच तोतया असल्याचं म्हटलं होतं. तसेच, माँ साहेब जिजाऊंच्या वंशाजांचा आणि त्यांचा काहीही संबध नसल्याचं लवांडे यांनी म्हटलं. आता, राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी नामदेव जाधव यांच्याबद्दल पोस्ट लिहिली असून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

मराठा व ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जाधव हे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण खराब होऊ शकते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जाधव यांच्यावर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार देऊन केली होती. आता, नामदेव जाधव यांच्याबद्दल थेट रोहित पवार यांनीच चौकशीची मागणी केली आहे. तसेच, राजे लखोजीराव जाधव यांच्या वंशजांनी रोहित पवारांकडे पत्र लिहून चौकशीची मागणी केलीय. ते पत्र आमदार पवार यांनी शेअर केले आहे. 

नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी आदरणीय पवार साहेबांवर टीका करत आहे. याबाबत चौकशी करून त्यांची तोतयेगिरी उघडकीस आणण्याची मागणी स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी केली. याबाबतचं पत्र त्यांनी दिलं.. स्वतःच्या फायद्यासाठी कुणी असं करत असेल तर हे चुकीचं असून याची चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या माहितीसाठी हे पत्र मी शेअर करत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

पवारांचा ओबीसी दाखला खोटा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजातून ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू आहे. आरक्षणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहे. गेल्या काही दिवासांपूर्वी खासदार शरद पवार यांचा ओबीसी दाखला असल्याचा दावा करण्यात येत होता, सोशल मीडियावर पवारांचा दाखला व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी हा दाखला खोटा असल्याचा दावा केला आहे. यावर आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर आरोप केला आहे. 

टॅग्स :मराठामराठा आरक्षणरोहित पवारअन्य मागासवर्गीय जातीराष्ट्रवादी काँग्रेस