Mumbai Rains: पावसामुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; तीन तास पडलेल्या कोसळधारांनी अनेक भागात पाणी साचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:18 IST2025-07-22T12:18:24+5:302025-07-22T12:18:37+5:30

Mumbai Heavy Rain News: सोमवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत मुंबई ११५ मिलिमीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला. मात्र, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.

Mumbaikars face 'dilemma' due to rain; Three-hour torrential downpours cause waterlogging in many areas | Mumbai Rains: पावसामुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; तीन तास पडलेल्या कोसळधारांनी अनेक भागात पाणी साचले

Mumbai Rains: पावसामुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; तीन तास पडलेल्या कोसळधारांनी अनेक भागात पाणी साचले

मुंबई : दीर्घ विश्रांतीनंतर कमबॅक केलेल्या कोसळधारांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना गारद केले. पहाटेपासूनच सकाळी अकरा वाजेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले. परिणामी शाळा गाठणाऱ्या विद्यार्थी, पालकांसोबत ऑफिससाठी धावपळ करणाऱ्या नोकरदारांचीही पावसाच्या पाण्यातून वाट काढताना दमछाक झाली. सोमवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत मुंबई ११५ मिलिमीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला. मात्र, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.

सकाळी पाच वाजल्यापासून वेगवान वाऱ्यासह पावसाने मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली. सात ते नऊच्या दरम्यान पावसाचा मारा सर्वाधिक होता. या काळात अंधेरी सब वे येथे पाणी साचल्याने वाहतुकीचा मार्ग गोखले ब्रिज आणि ठाकरे ब्रीजवरून वळविण्यात आला. कुर्ल्यातील एससीएलआर पूल, वाकोला पूल, पानबाई स्कूल, जोगेश्वरी एसआरपीएफ, वाकोला सेंटॉर पूल, राम नगर सब वे येथील वाहतूक धीम्या मार्गाने सुरू होती. मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिग्नल, कमानी येथे साचलेल्या पाण्याने वाहतूक ठप्प पडली. अंधेरी-कुर्ला, कुर्ला-सांताक्रूझ, कमानी-सायन,  कलिना-सांताक्रूझ या रस्त्यांवर ठिकठिकाणी कोंडी झाली होती. जोरदार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे मुंबईत पाणी साचल्याची सारवासारव पालिकेने केली.

तासांसाठी  ऑरेंज अलर्ट
सकाळी १० वाजेपर्यंत धो-धो पाऊस कोसळत असतानाच हवामान खात्याकडून पुढील तीन तासांसाठी मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला. याचदरम्यान पुढील २४ तासांसाठी मुंबईलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला. परंतु, हवामान खात्याने इशारा दिल्यानंतर पाऊस वाढण्याऐवजी कमी झाल्याचे चित्र दिसून आले.

आठ ठिकाणी झाडे पडली
कुर्ला येथील जंगलेश्वर रोड, घास कंपाऊंड, अंधेरी सब वे, रामनगर सब वे, अबोली, जुहू बस टर्मिनल परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोलची झाकणे उघडण्यात आली. शहरात सहा ठिकाणी शॉर्टसर्किट आणि आठ ठिकाणी झाडे पडली.

आजही मध्यम पाऊस
मंगळवारीही शहर आणि उपनगरांतील आकाश ढगाळ राहील. मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून, वादळी वारे वाहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Mumbaikars face 'dilemma' due to rain; Three-hour torrential downpours cause waterlogging in many areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.