"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:59 IST2025-12-16T09:54:59+5:302025-12-16T09:59:59+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. त्यानंतर रात्रीतून मुंबईत अनेक ठिकाणी ठाकरे बंधुविरोधात पोस्टर्स लावण्यात आले.

"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील महापालिकांसह मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली. निवडणुकीची घोषणा होताच रात्रीतून ठाकरे बंधुविरोधात मुंबईमध्ये बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स कुणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेच ठाकरे बंधुंना लक्ष्य करण्यात आले आहे.
दक्षिण मुंबईत ठाकरेंविरोधात बॅनर्स लावले गेले असून, त्यावर हिंदुत्व, घराणेशाही आणि मुंबई महापालिकेची सत्ता या तीन मुद्द्यांवर बोट ठेवण्यात आले आहे.
दक्षिण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर "जे हिंदुत्वाचे नाही झाले, ते मराठी माणसांचे काय होणार! मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नांदी लागू नको", असे म्हटले आहे.
मुंबई महापालिका, घराणेशाही
या बॅनर्सवरून अप्रत्यक्षपणे हिंदू-मुस्लीम मुद्द्यांचाही उल्लेख केला गेला आहे. "मुंबईचा रंग बदलू देऊ नको", असेही म्हटले गेले आहे. त्याचबरोबर "बृहन्मुंबई महापालिका हा काही कौटुंबिक व्यवसाय नाहीये", असे म्हणत ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.

ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिवसेना
उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा घटकपक्ष असला, तरी राज ठाकरे यांच्या मनसेसोबत बोलणी सुरू आहे. काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू विरुद्ध भाजप आणि शिंदेंची शिवसेना अशी लढाई बघायला मिळण्याचाच अंदाज आहे.
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये युतीमध्ये लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे दोन्ही सत्ताधारी पक्ष विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात राजकीय संघर्ष आतापासूनच सुरू झाला आहे. दोन्ही बंधू एकत्र आले, तरी आम्हाला फरक पडणार नाही, असे भाजपचे नेते म्हणत आहेत.