Mumbai: वांद्रेमध्ये मॉडेल तरुणीला टँकरने चिरडले; मित्र थोडक्यात बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 09:18 IST2024-12-07T09:14:54+5:302024-12-07T09:18:16+5:30
वांद्रे पश्चिममध्ये एका २५ वर्षीय मॉडेलचा टँकरने चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

Mumbai: वांद्रेमध्ये मॉडेल तरुणीला टँकरने चिरडले; मित्र थोडक्यात बचावला
Mumbai Hit And Run News: मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका मॉडेलचा मृत्यू झाला. शिवानी सिंह असे २५ वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती फिल्म इंडस्ट्रीत काम करायची आणि मालाड पश्चिम भागात राहत होती. मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. टँकरचे चाक अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी सिंह ही तिच्या मित्रासोबत मोटारसायकलवरून जात होती. रात्री ८ वाजता वांद्रे पश्चिममधील आंबेडकर मार्गावरील कलंत्री चौकात ते आले, येथून जात असताना त्यांच्या गाडीला टँकरने धडक दिली.
टँकरने धडक दिल्याने दोघे खाली पडले. मोटारसायकल चालवणारा तरुण बाजूला फेकला गेला, तर शिवानी टँकरच्या चाकाखाली आली. गंभीर जखमी झालेल्या शिवानीला भाभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. या अपघातात तिच्या मित्राचा पाय मोडला आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शिवानी सिंहच्या मित्राने हेल्मेट घातलेले होते. त्यांनी नशा केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले नाही. अपघातानंतर टँकरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून, लवकरच चालकाला अटक केले जाईल. टँकर जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.