Mumbai Rains Update: मुंबई उपनगर परिसरात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढीत तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल सेवेवरही याचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा पंधरा ते वीस मिनिटं उशीराने सुरू आहे. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील गाड्या सध्या वेळेत धावत आहेत.
उपनगरांना झोडपलंवांद्रे, अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरीवली या उपनगरांत सध्या तुफान पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तासाभरापासून या भागांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे. यामुळे पश्चिम द्रूतगती महामार्गावरील वाहतूकही मंदावली आहे.
सतर्कतेचं आवाहनमुंबईसाठी पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास लोकलसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.