Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:31 IST2025-11-28T11:27:31+5:302025-11-28T11:31:00+5:30
Mumbai Crime: मुंबईतील घाटकोपर येथे एका आईनं आपल्या पोटच्या मुलीला पैशांसाठी शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!
मुंबईतीलघाटकोपर येथे एका आईनं आपल्या पोटच्या मुलीला पैशांसाठी शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आई-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या माहितीनं परिसर हादरला आहे. पीडित मुलीनं आपल्या वर्गशिक्षिकेला तिच्यासोबत घडलेला संतापजनक प्रकार सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. घाटकोपकर पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई आणि शेजाऱ्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर परिसरात राहणाची पीडित मुलगी अल्पवयीन असून ती एका नामांकीत शाळेत इयत्ता १० वीत शिकत आहे. तिच्या आईला पैशांची चणचण भासत असल्यानं तिनं स्वत:च्याच मुलीला शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. पैसे मिळावेत म्हणून ती मुलीला दररोज शेजारच्या व्यक्तीकडे पाठवायची. मुलीनं अनेकदा नकार दिला. यावरुन वादही झाले, पण आई धमकी देऊन तिला जबरदस्तीनं शेजारच्या व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडत होती. ही सगळी माहिती पीडित मुलीनं पोलिसांना दिल्याचं सांगितलं जात आहे.
पीडित मुलीवर दररोज होत असलेल्या अत्याचारामुळे ती एकदा वैतागून घरातून पळून गेली. आपली त्रासातून मुक्तता होईल या उद्देशाने ती तीन दिवस आपल्या मैत्रिणीकडे राहिली. पण तिचा शोध लागल्यानंतर तिला पुन्हा जबरदस्तीनं घरी आणण्यात आलं होतं. पुढे तिच्यासोबत आणखी भयंकर प्रकार घडू लागला. आई आणि शेजारी दोघेही तिला पुन्हा पैशांसाठी इतरांकडे पाठवू लागले.
पीडित मुलगी एकदा शाळेत भर वर्गात रडू लागली. यावेळी वर्ग शिक्षिकेने तिची विचारपूस केली असता मुलीनं सगळा प्रकार आपल्या वर्गशिक्षिकेला सांगितला. तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराची माहिती वर्गशिक्षिकेला कळल्यानंतर त्यांनाही धक्काच बसला. वर्गशिक्षिकेने सगळा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना कळवला आणि शाळेने पुढाकार घेत थेट पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांना सगळा प्रकार पीडित मुलीनं सांगितला. त्यानंतर पीडिता अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलीच्या आई आणि शेजाऱ्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.