Mumbai Rains Updates : मान्सूनची दमदार एंट्री; पहिल्याच पावसात मुंबई गारद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 11:11 AM2021-06-09T11:11:49+5:302021-06-09T11:13:41+5:30

Mumbai Rains Updates : मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली.

Mumbai Rains Updates Streets get waterlogged as Mumbai receives heavy rainfall | Mumbai Rains Updates : मान्सूनची दमदार एंट्री; पहिल्याच पावसात मुंबई गारद

Mumbai Rains Updates : मान्सूनची दमदार एंट्री; पहिल्याच पावसात मुंबई गारद

googlenewsNext

सचिन लुंगसे

मुंबई : चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना मान्सूनने एन्ट्री पॉइंटलाच जोरदार दणका दिला. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या मान्सून पूर्व सरींचे स्वरूप बुधवारी सकाळी मान्सूनमध्ये कधी परावर्तित झाले ? हे मुंबईकरांना कळायच्या आतच सर्वदूर व्यापून राहिलेल्या मुसळधार ते अति मुसळधार सरींनी मुंबईला अक्षरशः कवेत घेतले; आणि पहिल्याच पावसात मुंबापुरीतल्या लोकल पासून बेस्टसह उर्वरित यंत्रणा कोलमडल्याने मुंबईकर नागरिकांची त्रैधा तिरपीट उडाली.

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी काहीशी उसंत घेतलेल्या पावसाच्या वातावरणात मुंबईवर ढगांचा गडगडाट सुरू झाला. मुंबईकरांची बुधवारची पहाट काळ्याकुट्ट ढगांनी उजाडली. तेजस्वी भास्कर केव्हाच ढगांच्या आड लपला होता; आणि वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत असलेले ढग मुंबईला अक्षरशः कवेत घेत होते. पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा मारा बुधवारचे सकाळचे अकरा वाजले तरी सुरू होता. या काळात दक्षिण मुंबई पासून दक्षिण-मध्य मुंबई आणि मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरात पावसाने रौद्र स्वरूप धारण केले. बोरवली, कांदिवली, गोरेगाव, अंधेरी, कुर्ला, मानखुर्द आणि पवई अशा उपनगरातल्या विविध ठिकाणी दाखल झालेल्या मान्सूनने मुंबईकरांना चांगलाच दणका दिला. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मध्ये भल्या पहाटे पाऊस घेऊन आलेल्या ढगांनी येथील रस्ते जलमय करून टाकले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर येथील हिंदमाता आणि माटुंगा येथील गांधी मार्केट परिसरात पहिल्याच पावसात पाणी साचण्यास सुरुवात झाली. रस्ते वाहतूक जलमय होत असतानाच दुसरीकडे रेल्वे वाहतुकीने सुद्धा नांगी टाकली. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल धावत असतानाच मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला ते सायन दरम्यानच्या ट्रॅकवर पावसाचे पाणी साचले. परिणामी कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद पडली. तिसरीकडे लालबहादूर शास्त्री मार्गावर देखील कुर्ला येथील शितल सिनेमा, कमानी जंक्शन आणि कुर्ला डेपो येथे रस्त्यावरून पाण्याचे धबधबे वाहू लागले. आंबेडकर रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग नेहमीच्या तुलनेत आज वाहनांच्या ऐवजी पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागला.

सकाळी अकरा वाजेपर्यंत मुंबईत मान्सून दमदार हजेरी लावत असतानाच अनेक मुंबईकरांनी बुधवारी वर्क फ्रॉम होम यास पसंती दिली. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या भरभरुन वाहणाऱ्या बाजारपेठा आज मात्र रिकाम्या पडल्या होत्या. किंचित झालेली गर्दी वगळली तर मुंबईच्या रस्त्यांवर बुधवारी केवळ पावसाचा धिंगाणा सुरू होता. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेले नागरिक वगळता मुंबई सकाळी तशी फार काही गर्दी नव्हती.

Web Title: Mumbai Rains Updates Streets get waterlogged as Mumbai receives heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.