Mumbai Rain Alert: विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने मुंबईला जोरदार तडाखा दिला. मागील तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. याचा थेट फटका वाहतुकीवर झाला आहे. लोकल ट्रेन, रस्ते वाहतुकीबरोबरच हवाई वाहतुकीतही अडथळे निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईत आलेली विमानांच लँडिंग अचानक रद्द करावं लागलं आणि बराच वेळ ही विमाने हवेत घिरट्या मारत राहिली. खराब हवामानामुळे एक विमान दुसरीकडे वळण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे हवाई वाहतूकही विलंबाने सुरू आहे. मुसळधार पाऊस आणि खराब हवामान यामुळे दृश्यमानता कमी झाली असून, मुंबईत विमानतळावर अचानक ९ विमानांचे लँडिंग अचानक काही वेळासाठी रोखण्यात आले.
विमानतळावर लँडिंगसाठी आलेल्या ९ विमानांना अचानक गो अराऊंडचा मेसेज दिला गेला. त्यामुळे ही विमाने बराच वेळ आकाशात घिरट्या मारत होती. दरम्यान, एका विमान ऐनवेळी दुसरीकडे वळवण्यात आले.
विमान कंपन्यांकडून प्रवाशांना सल्ला
मुंबईत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे. मुंबई आणि विमानतळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम होत आहे.
विमानतळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर पाणी भरले गेले असून, वाहतूक मंदावली आहे. विमान प्रवास करणार असाल, तर लवकर निघा आणि तुमच्या विमानाचे अपडेट जाणून घेत रहा. विमानतळावर आमच्या टीम तुमच्या मदतीसाठी तयार आहेत, असे आवाहन कंपन्यांकडून करण्यात आले आहे.
रस्ते पाण्याखाली, लोकलही उशिराने
मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम रस्ते आणि लोकल ट्रेनवर झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून, काही ठिकाणी रेल्वे रुळावरही पाणी आले आहे. त्यामुळे लोकल उशिराने धावत आहेत.