Mumbai Crime: डिजिटल अरेस्ट प्रकरणात सांगलीच्या तरुणाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 14:08 IST2025-10-11T14:07:52+5:302025-10-11T14:08:13+5:30
Mumbai Digital Arrest Case: १५ लाखांच्या फसवणुकीत बँक खात्याचा वापर

Mumbai Crime: डिजिटल अरेस्ट प्रकरणात सांगलीच्या तरुणाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई : डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवून १५ लाखांच्या फसवणूक प्रकरणी मुंबईच्या मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनीसांगलीच्या तरुणाला शुक्रवारी अटक केली. विकास चव्हाण (२८) असे आरोपीचे नाव असून, या प्रकरणात त्याच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला होता.
ही फसवणूक १४ ते १६ एप्रिल दरम्यान घडली. तक्रारदाराला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता. कॉल करणाऱ्याने दिल्ली पोलिस मुख्यालयातून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीच्या बँक खात्यात बेकायदेशीर व्यवहार झाल्याची भीती दाखवली. त्यानंतर अधिकारी भूपेश कुमार आणि गोपेश कुमार असल्याचे भासवत व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क केला.
त्यांनी सीबीआय लेटरहेडवरील बनावट अटक आदेश आणि अन्य कागदपत्रे दाखवून फिर्यादीचे नाव नवाब मलिक आणि हसीना पारकर यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी जोडल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराकडून फंड व्हेरिफिकेशनच्या बहाण्याने विविध बँक खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करून घेतले.
राजस्थानमध्येही गुन्हा
तपासात ही रक्कम फेडरल बँकेतील एका खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. त्यापैकी ५ लाख रुपये तत्काळ अन्य खात्यात वळते झाले. पुढे ती रक्कम धनादेशाद्वारे काढण्यात आली. हे खाते सांगलीतल्या खानापूर तालुक्यातील तांदळगावचा रहिवासी असलेल्या विकास याचे असल्याचे स्पष्ट होताच पाेलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर मुंबई व राजस्थान येथेही गुन्हे दाखल असून तपास सुरू आहे. त्याला १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.