जलवाहिन्यांच्या गळतीवर पालिकेचा ६० कोटी आपत्कालीन खर्च; पाणीचोरी अद्यापही प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:23 IST2026-03-26T10:23:14+5:302026-03-26T10:23:33+5:30

धरणांमध्ये ४१ टक्केच पाणीसाठा शिल्लक

mumbai municipality spend 60 crore on emergency water leakage water theft still beyond administration control | जलवाहिन्यांच्या गळतीवर पालिकेचा ६० कोटी आपत्कालीन खर्च; पाणीचोरी अद्यापही प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर

जलवाहिन्यांच्या गळतीवर पालिकेचा ६० कोटी आपत्कालीन खर्च; पाणीचोरी अद्यापही प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या फुटल्याने दुरुस्तीच्या कामांवर गेल्या सहा वर्षात ६० कोटी रुपये आपत्कालीन खर्च झाला आहे. तरीही अनेकदा जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार होत असल्याने हा खर्च निष्फळ ठरला आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या केवळ ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मुख्य जलवाहिन्यांची गळती थांबविण्यासाठी पालिकेने १ जानेवारी २०२० ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत ६० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. जलवाहिन्या बदलणे व नियमित दुरुस्तीच्या कामे करूनही तातडीच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी सुमारे १० कोटी खर्च करावे लागतात. सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांना माहिती अधिकारातून हा तपशील उपलब्ध झाला.

रस्ते कामे किंवा इतर प्रकल्पांच्या वेळी विविध कंत्राटदार आणि कंपन्यांकडून या जलवाहिन्यांना हानी होऊन गळती झाल्यास पालिका प्रशासन संबंधित कंत्राटदारांना दंड आकारते. २०२० पासून आतापर्यंत पालिकेने तब्बल १६ कोटी दंड वसूल केला आहे. दरम्यान, पालिकेकडून दरवर्षी दुरुस्तीवर केला जाणारा खर्च कोटींमध्ये होत असेल, तर नवीन जलवाहिन्या टाकून उपयोग काय? पालिका ३२ टक्के गळतीवर केव्हा आणि काय उपाय करणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

जलवाहिन्यांना गळती लागण्याची प्रमुख कारणे

जलवाहिन्या माती, गाळ, ओलसर हवामान, कचरा आणि रसायनांमुळे खराब होऊन त्यांना गंज चढल्याने गळती वाढते. तसेच मुंबई मेट्रो, रस्ते अशा विविध प्राधिकरणांच्या कामातही जलवाहिन्या फुटतात. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले जाते, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या जलस्त्रोतांमुळे शमते संपूर्ण शहराची तहान

मुंबईला सध्या तानसा, मोडक सागर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा, अपर वैतरणा आणि भातसा या जलस्रोतांतून पाणीपुरवठा होतो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून १०० कि. मी. किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर आहेत.

याशिवाय मुंबईच्या परिसरात दोन लहान जलाशय विहार आणि तुळशी असून, मुंबई शहराला या सर्व जलस्रोतांतून ३९५० द. ल. लि. प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

या जलाशयांतील पाणी जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत वाहून आणण्याचे काम २,२३५ मि.मी. ते ३,००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे व काँक्रिटच्या भूमिगत जलबोगद्याच्या सहाय्याने होते.

जलवाहिन्यांची सुरक्षा व देखभाल आवश्यक

या भूमिगत जलवाहिन्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व डोंगराळ भागातून मुंबईकडे आणण्यात आल्या असून गळती आणि चोरी रोखण्यासाठी या जलवाहिन्यांची सुरक्षा आणि देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
 

Web Title : मुंबई में जल पाइपलाइन रिसाव से करोड़ों का नुकसान; चोरी अनियंत्रित।

Web Summary : मुंबई में जल पाइपलाइन रिसाव के कारण नगरपालिका को छह वर्षों में ₹60 करोड़ का नुकसान हुआ। मरम्मत के बावजूद, रिसाव जारी है, जो पुरानी पाइपों और निर्माण क्षति से बढ़ गया है। गर्मी बढ़ने के साथ जलाशय का स्तर 41% तक गिर गया है।

Web Title : Mumbai's water pipe leaks cost millions; theft remains uncontrolled.

Web Summary : Mumbai's water pipe leaks have cost the municipality ₹60 crore in six years. Despite repairs, leaks persist, exacerbated by aging pipes and construction damage. Water theft remains a major concern as reservoir levels drop to 41% amid rising heat.